वाढोणा शेतशिवारात नर बिबट पडला – विहीरीत वनविभागाच्या रेस्क्यु टीमने सुखरूप काढले बाहेर

0
780
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

      सुर्य आग ओकत असतांना प्राण्यांच्या जिवाची काहीली होत आहे. उन्हात तहाण भागविण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. अशातच पाण्यासाठी भटकंती करीत शेतात आलेला एक नर बिबट शेळ्या-मेंढ्या व शेतकऱ्याला घाबरून चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आमला बिट सर्कलमधील वाढोणा शेतशिवारातील विहीरीत शुक्रवारी (ता. ११) रात्री पडला. साडेपाच तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये वनविभागाच्या रेस्क्यु टीमने या नर बिबटला शनिवारी (ता. १२) पहाटे सुखरूप बाहेर काढले व रात्री जंगलात सोडुन दिले.

       चांंदूर रेल्वेवरून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या रहिमाबाद वाढोणा येथील भरतसिंग मोतीसिंग बंगरे हे शेतकरी शेतात शेळ्या-मेंढ्या असल्यामुळे शुक्रवारी रात्री शेतातच होते. रात्री ११ च्या सुमारास बंगरे बाजुला बसले असता त्यांना शेळ्या-मेंढ्यांचा जोरजोरात आवाज ऐकु आला. यामुळे बंगरे यांनी तत्काळ गोठ्याजवळ धाव घेतली असता अंदाजे ५० फुट अंतरावर बिबट उभा दिसला. बिबट दिसताच बंगरे घाबरले तसेच बिबट सुध्दा घाबरला. याचदरम्यान बाजुला असलेल्या विहीरीत बिबट्या पडल्याचे सांगण्यात आले. ही माहिती चांदूर रेल्वे वनविभागाला मिळताच वनविभागाने रात्री ११.३० वाजतापासुन रेस्क्यु ऑपरेशन करीत साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर शनिवारी पहाटे ५ वाजता या नर बिबटला सुखरूप बाहेर काढण्यात आले. विहीरीमध्ये मॅन्युअली पिंजरा टाकुन त्याव्दारे बाहेर काढले. त्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरीर तपासणी करून फिटनेसचे प्रमाणपत्र दिले. यानंतर शनिवारी रात्रीच्या दरम्यान सदर बिबट्याला जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
या अॉपरेशनमधे चांदूर रेल्वे वन विभागाचे आरएफओ आशिष कोकाटे, आरएफओ वाजगे, वनपाल वाळके, वनरक्षक फिरोज, उज्जैनकर, डोंगरे, आखरे, नाईक ,कु.पाताळबंशी, शेंडे मॅडम, वाहन चालक पंचभाई, वनमजुर गवई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.