*ACB च्या हातात तुरी देऊन मुख्य आरोपी फरार*

0
869
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी-सचिन बडे :-

बीड : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शनिवारी सापळा रचून धारूर येथील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह इतर दोघांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, बीड येथील कार्यालयात चौकशी सुरू असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी छत्रभुज साहेबराव थोरात हा फरार झाला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीखोरावरील गुन्ह्यामध्ये तडजोड करण्यासाठी पैशाची मागणी केल्यावरून धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन गफुरोद्दीन इनामदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, छत्रभुज साहेबराव थोरात व अशोक हंडीबाग यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश काळे व अशोक हंडीबाग हे घटनास्थळावरूनच फरार झाले होते. तर मुख्य आरोपी छत्रभुज थोरात, अमिरोद्दीन गफुरोद्दीन इनामदार, दत्तात्रय बिक्कड यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी बीड कार्यालयात आणले होते. चौकशी सुरू असताना छत्रभुज थोरात याने बाथरुमला जाण्याचा बहाना करून एसीबी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळ काढला. सर्व आरोपींना जेरबंद करण्याच्या वेळी थोरात हा फरार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाचपैकी केवळ दोन आरोपी आता ताब्यात असून मुख्य आरोपीच फरार झाला असल्याने तर्क वितर्क काढले जात आहेत. एसीबी चे कर्मचारी भाऊराव राठोड यांच्या फिर्यादीवरून बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष काळे अधिक तपास करीत आहेत.