कवठा कडूत गुंडभर पाण्यासाठी पायपीट – लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष

0
726
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे : – (शहेजाद  खान) 

चांदूररेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथे बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुंडभर पाण्याकरिता महिलांची पायपीट होत असून मिळेल तेथील पाण्याचा ग्रामस्थांना वापर करावा लागत आहे..

अडीच हजार लोकसंख्या असलेले व कृषी क्षेत्रात प्रगती केलेले गाव अशी या कवठा कडूची ओळख आहे. या गावात आधी बारमाही पिके घेतली जात होती. पण या एक वर्षात गावातील व परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने संत्रा बागा वाळल्या. गावात पिण्यासाठी पाणी नाही, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळीही तळाला टेकली, त्यामुळे या गावाची अवस्था भयाण होताना दिसून येत आहे..

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दोन विहिरी आहेत, पण त्यांची पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामपंचायतने गावालगतच्या दोन विहिरी अधिग्रहण केल्या. यामध्ये हिम्मत लोमटे, अशोक डहाके यांनी आपल्या विहिरीचे पाणी गावाला दिले. मात्र, त्या विहिरीचे पाणीदेखील गावाला अपुरे पडत असल्याने गावात बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ बैलबंडीवर ड्रम बांधून पाणी आणत आहेत..

गावातील लोकांना बारा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. पण गावातील गुरा-ढोरांना पिण्यासाठी पाण्याची कोणतीच सोय नव्हती. तेव्हा संतोष कडू यांनी आपल्या शेतातून पाईपलाइन टाकून गुरांना पाणी पिण्याची सोय करून दिली. पण त्या ठिकाणीसुद्धा गावातील लोकांनी पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्या विहिरीला २० मिनिटेच पाणी पुरत असल्याने तेसुद्धा शक्य होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एका दिवशी आलेले पाणी हे नागरिकांना बारा दिवसांकरिता साठवून ठेवावे लागत आहे. साचून ठेवलेल्या पाण्यामुळे अनेक आजार उत्पन्न होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. हे सगळे असताना तालुका स्तरावरून कोणत्याही बड्या अधिकाऱ्याने या गावाला भेट दिली नाही. पण ग्रामपंचायत स्तरावरून त्यावर आटोकाट उपाययोजना सुरू असल्याचे ग्रामसेवक व उपसरपंच यांनी सांगितले..

सात विहिरी, नऊ हातपंप

गावात सात सार्वजनिक विहिरी आहेत. पण त्या कोरड्या अवस्थेत आहेत. नऊ हातपंप आहेत पण त्यातले दोनच सुरू आहेत. या हातपंपांनाही गुंडभरच्या वर पाणी येत नाही..