चांदूर रेल्वेच्या ‘वॉटरमॅन’ ची मोबाईल पाणपोई – दररोज तीस किलोमिटरचा प्रवास, महागड्या पेट्रोलचीही तमा नाही

0
781
४५ डिग्री तापमानात तहानलेल्यांसाठी देवदुत बनले विवेक चर्जन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
 कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायण, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. मात्र अनोळखी वाटसरूंना थंडगार पाणी पाजण्याचा अजब छंद अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एका शेतकऱ्याने जोपासला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी महागड्या पेट्रोलची तमा न बाळगता हा शेतकरी दररोज तीस किलोमिटरचा प्रवास करतो हे विशेष. ते चांदूर रेल्वेचे ‘वॉटरमॅन’ म्हणुन प्रसिध्द झाले आहे.
     चांदुर रेल्वे तालुक्यातील बासलापूर या गावातील अल्पभूधारक शेतकरी विवेक चर्जन हे सकाळी शेतीची कामे आटोपून दुपारी घरी येतात. थंडगार पाण्याच्या पिशव्या भरून दुचाकीवर टांगणे आणि गावापासून अंदाजे ३० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणे हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. या प्रवासादरम्यान मिळणाऱ्या प्रत्येक वाटसरूंना ते थंडगार पाणी देऊन त्यांची तृष्णा भागवितात. सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला असल्याने प्रत्येक वाटसरूला पाण्याची गरज असते. यामुळे रखरखत्या उन्हात अचानक समोर येणारे विवेक चर्जन हे तहानलेल्या वाटसरूंसाठी जणू जलदूत ठरले आहेत. वाटसरूंना थंड पाणी पाजण्यास सोबत रक्तदान करणे, गरिबांच्या औषधोपचारासाठी वर्गणी गोळा करून त्यांना मदत करणे आदी सामाजिक कार्यही विवेक चर्जन करीत आहे.
     मनुष्यांसोबत विवेक चर्जन हे प्राण्यांची सुध्दा सेवा करतात. प्राण्यांसाठी उन्हाळ्यात त्यांनी अमरावती मार्गाने पोहरा तसेच शेतशिवारात जलपात्र लावले आहे. दररोज ते या जलपात्रात न चुकता पाणी टाकतात. अशातच दररोज पक्षीसुध्दा चक्क विवेक चर्जन यांची वाटच बघत असल्याची माहिती आहे. त्यांच्या या सेवेमुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार सुध्दा करण्यात आला आहे.
माझा मुलगा एक वर्षाचा असताना प्रवासादरम्यान त्याला तहान लागली होती. मात्र त्याला वेळेवर पाणी मिळाले नव्हते. यामुळे आपण हा उपक्रम तेव्हापासून राबविण्याचा निश्चिय केल्याचे विवेक चर्जन यांनी सांगितले.