आदिवासींचा संपूर्ण विकास करण्यासाठी भाजपला विजयी करा

0
924
Google search engine
Google search engine

जव्हार, बोईसरच्या विराट जाहीर सभेत ना. पंकजाताई मुंडे यांचे आवाहन

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

पालघर दि. २४ – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर होता, आमचे सरकार आल्यानंतरच विकासाची खरी सुरुवात झाली असे सांगून आदिवासींचा संपूर्ण विकास करण्यासाठी भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

पालघर लोकसभा निवडणुकीतील भाजपा, रिपाइं, रासप, श्रमजीवी संघटना व जन आंदोलन समितीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारार्थ जव्हार व बोईसर येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खा. कपील पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आ. सीमा हिरे, आ. संजय केळकर, आ. किसन कथोरे यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहूल भाग असल्यामुळे याठिकाणी स्वातंत्र्यानंतरही विकासाचे मुलभूत प्रश्नही मार्गी लागले नव्हते. आमचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची खरी सुरुवात झाली. पोषण, शिक्षण, सिंचन व संरक्षण हे आदिवासींना मिळाले पाहिजे ही आमची भूमिका होती, त्यानुसार इथे काम होत असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
कुपोषणाचा सर्वात महत्वाचा प्रश्न महिला बालविकास खात्याच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय कर्मचा-यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने योजना नीटपणे पोहोचत नव्हत्या, त्यामुळे विशेष अध्यादेश काढून या रिक्त जागा भरल्या, जेणेकरून योजना याठिकाणी पोहोचू शकल्या. महिला बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज, कौशल्य विकास मधून तरूणांना रोजगार, प्रधानमंत्री आवास योजनेचे २४ हजार घरकुल आदी कामे इथे होवू शकली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ४० किमीचे रस्ते करून हा भाग विकासाच्या हायवे वर नेण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

वनगा यांचे विचार जोपाण्यासाठी गावीत यांना विजयी करा

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे, वनगा हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटचे स्नेही होते तसेच ते माझ्या दक्षता कमिटीचे सदस्यही होते असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. आदिवासींचे प्रश्न नेहमी पोटतिडकीने मांडणा-या वनगा यांनी या भागाचे मागासलेपण दूर करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले, त्यांचे विचार कुणाच्या मालकीचे नसून भाजप व त्यांच्यावर प्रेम करणाराचे आहेत, त्यामुळे त्यांचे विचार भविष्यात जोपासण्यासाठी व या भागाचा सर्वागिण विकास साधण्यासाठी भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दोन्ही ठिकाणी झालेल्या सभेला प्रचंड जनसागर उपस्थित होता.