शेतकऱ्यांचा साथिदार “कंदील”  काळोखात लुप्त

0
1856
Google search engine
Google search engine

हेमंत व्यास / कडेगाव :-

कंदील….! रस्ता चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवणारा, अंधाऱ्या रात्री शेतात विविध प्रकारची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांचा साथीदार, शेतीतून आलेले पैसे मोजण्यासाठी मदत करणारा , तमाशाच्या फडाच्या ताफ्याला वाट दाखवणारा,पिंगळ्याला भिक्षा मागण्यांसाठी भल्या पहाटे मदतीला येणारा,पाहुणे आले की एकमेकांच्या घरी देवाण घेवाण होणारा, एखाद्या सासुरवाशिणीला अंधाऱ्या रात्री पत्र वाचण्यास मदत करणारा,तर त्याच्या उजेडावर अभ्यास करून अनेकांची आयुष्य उजळवून टाकणारा व ग्रामीण भाग प्रकाशमान करणारा कंदील आज विजेच्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशामुळे अंधाऱ्या काळोखात लुप्त झाला…..!

पत्र्याचा बुड असणारा कंदील व बत्ती आणि काळा धूर ओकणारी चिमणी ग्रामीण भागचा जणू जनरेटरच..! त्याकाली ज्या घरात बत्ती असेल ते मोठे घर कारण कंदिलाच्या तुलनेत बत्ती चा प्रकाश खुप मोठा व लख्ख असायचा ग्रामीण भागात वरात काढण्याचा प्रकार असायचा एखाद्या घरात नविन लग्न झाले की त्या नवविवाहीत जोडप्याची बैलगाडीतुन गावातुन वाजत गाजत देवाला जायची प्रथा होती त्यास वरात म्हणतात त्या वरातीपुढे दोन्ही बाजुला डोक्यावर बत्ती घेवुन माणसे असायची कारण वरातीत प्रकाश असावा म्हणुन आता अशा बत्त्या फारशा बघायलाच मिलत नाहीत कंदिला प्रमाणे बत्त्याही गुल झाल्या आहेत.कंदील हा ग्रामीण भागाचा एक स्वतंत्र विषयच होता. तो म्हणजे त्यात रॉकेल घालणे,सुती वात ,राख टाकून त्याची काच पुसणे,नाळक लावून त्यात तेल ओतणे,काजळी काढणे ही जबाबदारीची व शांत माणसानं करावीत अशी कामे होती.खुंटीला स्वतंत्र जागा त्यासाठी असायची.दिस मावळतीच्या वेळी कंदीलाची ही कामे उरकली जायची.आणि अंधार पडला की खेडी कंदील प्रकाशमान करत होता. मातीच्या चुलीवर ढनाढना जळणारा दिवा तव्यात भाकरी व कालवण तयार करायला मदत करी,तर पोर कंदिलाच्या उजेडात प्रकाश येईल तिथपर्यंत बसून भुईला गुडगे टेकवून गालाला हात लावत कोपार पुस्तकावर टेकवून अभ्यास चालायचा.

याच कंदिलाच्या उजेडात चरून आलेली जनावर गोठ्यात बांधली जायची.कंदील मध्ये ठेऊन सार घर त्याच्या उजेडात जेवायला बसायचं,जेवणखाण झालं की शेतातील राखण,पाणी पाजणे वस्तीला पहारा देणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यासाठीकंदील म्हणजे जणू साथीदारच ! एका हातात काठी व दुसऱ्या हातात कंदील घेऊन काळोखी रस्ता तुडवणाऱ्याला आपली सावली बघूनच भय वाटावं..! मग लांबूनच आरोळी यायची कोण हाय? पलीकडून कंदील असेल तर तो तोंडावर त्याचा उजेड पाडून आपली ओळख पटवून देई, शेताला पाटांन पाणी देणारा माणूस भुंड्यावर कंदील ठेवत दोन्ही हातानी दार धरायचा. पाटाच्या पाण्यात कधी किरडु दार धरणाराच्या हातावर चढायचं! हाताला झिंजाडा मारून उजेडात त्याचा समाचार घेई,

तमाशाच फड असला की त्यांच्या राहुटीला व गावोगावी बैल गाडीतून प्रवास करायचा त्यावेलेस दोन्ही बैलांच्या मध्ये गाडीच्या दांड्याला कंदील अडकवला जायचा,त्याद्वारे गावोगावचा प्रवास चालायचा.भल्या पहाटे भिक्षा मागणाऱ्या पिंगळ्याला तर कंदील म्हणजे जणू सोबतीच!पाहुणेआले की घरोघरी या कंदीलाची देवाण घेवाण व्हायची,लग्नात तर हमखास देवाण घेवाण केली जायची व रूखवतात पण ठेवायचे पूर्वी रेशनकार्डवर मुबलक रॉकेल मिळायचं ! कंदिलाच्या उजेडावर अनेक जण घडले मोठ्या पदावर गेले,आयुष्य व संसार उजळले मात्र चांदण पेरणारा कंदील डीजीटल च्या व एल ई डी च्या काळात अंधारात गायब होत भंगारात गेला.आता त्याच्या काचेचा वापर देवघरात दिवा विझू नये म्हणून लावण्यासाठी केला जातोय.मोठमोठ्या सिमेंटच्या घरात आताही कंदील व बत्ती दिसते मात्र त्यात रॉकेल व वात नसते.सरकारी कृपेने आता गावोगावी वीज आली,जनरेटर इन्व्हर्टर सौर कंदील गँस बत्ती चा जमाना आला व खेडी उजळली व प्रकाशमान झाली.मात्र अनेकांच्या अंधारातील वाटा प्रकाशमान करणारा कंदील मात्र अंधारात लुप्त झाला गायब झाला !!