पोलीस हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीसांना आढळले हरणाचे मास >< हत्या प्रकरणासोबत आणखी एका प्रकरणाची भर

0
861
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
       चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील बंजारा तांडा परिसरात अवैध गावठी दारू उद्ध्वस्त करून परत निघत असतांना दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. यामध्ये एका पोलीसाची हत्या झाली असुन एक जखमी रूग्णालयात उपचार घेत आहे. याच प्रकरणातील आरोपींच्या घरची तपासणी करण्याकरीता मंगळवारी पोलीसांची चमु गेली असता त्यांच्या घरून हरिणवर्गीय प्राण्याचे खुरे व मास आढळून आले आहे. त्यामुळे हत्या प्रकरणासोबतच आणखी एका प्रकरणात भर पडली आहे.
         चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील बंजारा तांड्यावर अवैधरित्या गावठी दारूचे उत्पादन होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कवडुजी जाधव (५५) यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शामराव जाधव यांनी शिपाई सतीश शरद मडावी (४१) यांना सोबत घेतले. त्यानंतर ते दोघे दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेले. तांडा परिसरातील एका शेतशिवारातील गावठी दारू अड्डा त्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर ते जाधव यांच्या अॅवेंजर दुचाकीने पोलीस स्टेशनकडे परत जाण्यासाठी निघाले असता त्याच ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी दारू विक्रेत्यांच्या मारहाणीत खाली कोसळलेल्या सतीश मडावी यांच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार करण्यात आला. यामध्ये मडावी यांचा जागीच मृत्यु झाला असुन जाधव गंभीररित्या जखमी झाले आहे. जाधव यांच्यावर गेट लाईफ हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे. अशातच मंगळवारी दुपारी पोलीसांची चमु आरोपींच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी मांजरखेड येथील तांडा परिसरात गेली असता आरोपींच्या घरून ४ पाय (खुरे) व मास आढळून आले. यानंतर वनविभागाला सदर मास कशाचे आहे याबाबत मास व खुरे वनविभागाचे वनपाल दिनेश वाळके यांच्याकडे सोपविण्यात आले होते. याची तपासणी करून सदर मास व खुरे हे हरिणवर्गीय प्राण्याचे असल्याचा रिपोर्ट त्यांनी पोलीसांना दिला. या प्रकरणात आरोपी दिलीप शालिकराम राठोड (४५) रा. मांजरखेड तांडा यांच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे कलम २(१६) (२०), २ (३६),९ कलम ३९, ४८, ४९, ५१ अन्वये चांदूर रेल्वे पोलीसांना गुन्हा नोंदविला असुन आरोपी फरार आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे. पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणाचा तपास करीत असतांना आता पोलीसांना या नवीन प्रकरणाचासुध्दा तपास करावा लागणार आहे.
         यापुर्वी पोलीस हत्याप्रकरणात पोलीसांनी एकुण सात आरोपींना अटक केली आहे. परंतु यामधील मुख्य आरोपी उमेश शालिकराम राठोड (३०) व अजय उर्फ राजा सकरू राठोड (२०) यांना अटक केली असुन त्यांच्यावर कलम ३०२,३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ५ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपींना लपविण्यास व पळविण्यास मदत करणारे विष्णु रतनसिंग चव्हाण (३०), राजु वासुदेव राठोड (३५), बाला लक्षीराम जाधव (३५), दिनेश शालिकराम राठोड (३५) व सकरू लक्षीराम राठोड (४०) यांच्यावर कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यांना ही अटक करण्यात आली आहे.
तस्करीचा होऊ शकतो भांडाफोड
 तांडा परिसरातुन वन्यप्राण्यांच्या मांसाची पुर्वीपासुनच मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे वनविभागाने या भागात खोलवर चौकशी केल्यास तस्करीचा भांडाफोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वनविभाग सुध्दा पोलीसांसोबत या प्रकरणात खोलवर चौकशी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिनेश राठोडचा पत्रकार हल्ला प्रकरणातही सहभाग
पोलीस हत्या प्रकरणात कलम २१२ मध्ये अटकेत असलेला आरोपी दिनेश राठोड हा पहिले होमगार्डमध्ये कार्यरत होता. दिनेश राठोड याचा ३१ डिसेंबर २०१६ मध्ये चांदूर रेल्वेतील पत्रकारावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात सुध्दा सहभाग होता. त्यामुळे पोलीसांनी दिनेश राठोड याची कसुन चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच आरोपी दिनेश राठोड हा भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी नियुक्त असल्यामुळे त्याला राजकीय पाठबळ तर मिळत नाही आहे ना ? अशी चर्चा जोर धरत आहे.