रहिमाबाद येथील कोरड्या विहिरीत बिबट आढळला मृतावस्थेत – २० दिवसांत दुसरी घटना

0
813

मृत्यूबाबत व्यक्त होत आहे संशय

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घटना

चांदूर रेल्वे : (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत कु-हा बिटमधील ग्राम रहिमाबाद येथील शेतशिवारातील एका विहीरीत नर बिबट पडला होता. त्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले होते. ही घटना ताजीच असतांना पुन्हा याच परिसरातील शेतातील विहिरीत एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना गुरुवारी (ता. ३१) सकाळी उघडकीस आली. वनविभागाने बिबट्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांंदूर रेल्वेवरून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या रहिमाबाद वाढोणा येथील गट सर्व्हे क्र. ६९ मधील जगन्नाथ जागळे, रा. कु-हा यांच्या शेतातील कच्चे बांधकाम केलेल्या कोरड्या विहिरीत अंदाजे ४ वर्षांचा बिबट मृतावस्थेत आढळला. सदर विहीर जास्त खोल नसून बिबट सहजतेने उडी घेऊन बाहेर निघू शकला असता, ही विहिरींची स्थिती आहे. त्यामुळे हा बिबट मारला की नैसर्गिक मृत्यू झाला, याबाबत वनविभाग संभ्रमात आहे. मृत बिबटाच्या एकूणच स्थितीवरून आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान घटनास्थळी आकोट येथील वन्य जीव विभागाचे श्वान पथक व वन्यजीवतज्ज्ञ वनरक्षक आतिफ हुसेन यांनी घटनास्थळ पिंजून काढले. वनकर्मचाऱ्यांनी विहिरीतून बिबटाला बाहेर काढले व नंतर पशुवैद्यकीय अधिकारी मांजरे, पावडे यांनी घटनास्थळी विच्छेदन केले. त्यानंतर ग्राम रहिमाबाद शेतशिवारात त्याला भडाग्नी दिला. बिबटाच्या मृत्यूबाबत संशय आल्यामुळे त्याचे तपास कार्य वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविला असून, घटनास्थळी उपवनसंरक्षक हेमंत मीणा, सहायक वनसरंक्षक अशोक कविटकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर आदींनी भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.

२० दिवसांत दुसरी घटना

रहिमाबाद शिवारात २० दिवसांपूर्वी म्हणजेच ११ मेला रात्री ११ वाजताच्या दरम्यान शेतकरी भरतसिंग बंगरे यांच्या शेतातील विहिरीत नर बिबट्या पडला होता. त्याला शर्तीच्या प्रयत्नानंतर वनकर्मचाऱ्यांनी बाहेर काढून वाचविण्यात यश आले होते. त्यानंतर गुरूवारी ही घटना घडली. मात्र, या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाला.