बापरे बाप….. केवळ ७ आमदार अन् ताफा तब्बल ३५-४० गाड्यांचा – विधीमंडळाच्या अंदाज समितीची चांदूर रेल्वेला धावती भेट

0
967

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

     विधीमंडळाच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजना समिती बुधवारी अमरावती शहरात दोन दिवसीय जिल्हा दौऱ्याकरूता दाखल झाली. या समितीने बुधवारी दुपारी सर्वप्रथम चांदूर रेल्वे तालुक्याला धावती भेट देऊन एमआरजीएसच्या कामांची पाहणी केली. या समितीमध्ये ७ आमदार शहरात आले असता त्यांच्यामध्ये एकामागोमाग तब्बल ३५-४० गाड्यांचा ताफा यावेळी पहावयास मिळाला.

      या समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम (नाशिक) व सदस्य आ. कृष्णा खोपडे, आ. राजेश काशिवार, आ. कृष्णा गजभिये, आ. वसंत चव्हाण, आ. डॉ. रायमुलकर, आ. उन्मेश पाटील यांनी सुरूवातीला चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी व बासलापुर येथील वनविभागाच्या रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. यासोबतच चांदूर रेल्वे शहरातील नगर परीषद, बांधकाम विभागाच्या एमआरजीएसच्या कामांची सुध्दा पाहणी केली. यानंतर स्थानिक विश्रागृहावर भोजन अवकाश घेऊन सदर समिती धामणगाव रेल्वे कडे रवाना झाली. या समितीत एकुण २९ आमदार असुन त्यापैकी केवळ ७ आमदार या दौऱ्यावरमध्ये सामिल झाले होते. या ७ आमदारांमागे जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा लवाजमा होता. विश्रामगृहात समितीची स्थानिक पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता सदर दौरा हा अत्यंत गोपनीय असुन याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही असे समितीचे अध्यक्ष आ. अनिल कदम यांनी सांगितले.

समितीचा पाहणी दौरा ठरला केवळ दिखावा

        महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या एमआरजीएसच्या कामामध्ये अनेक ठिकाणी मोठी अनियमितता आहे. या कामांमध्ये अनेक ठिकाणी गडबड झाल्याचे सुध्दा समोर आलेले आहे. असे सर्व होत असतांना रोजगार हमी योजना समितीने काही मिनीटांमध्येच पाहले तरी काय? आणि एवढा मोठा लवाजमा व अवाढव्य खर्च करून पाहले तरी काय?  असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या कामांमध्ये शासकीय निधीचा अपहार होत असतांना त्याकडे लक्ष देण्याऐवजी सदर समिती केवळ सहलीकरीता तर आली नाही ना? असाही सवाल यानिमित्याने उपस्थित झाला आहे.