चांदूर रेल्वे येथील कृषी विभागाच्या कृषि मेळाव्यापासून शेतकरी वंचीत – आत्मा सदस्यांनाही दूर ठेवल्याचा आरोप : कृषि विभागाचा धावपळीत मेळावा

0
1270
Google search engine
Google search engine

उपस्थित शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दण्ड

चांदुर रेल्वे :- ( शहेजाद खान) 

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील खरे शेतकरीच वंचित राहिले असून कृषि विभागाकडून धावपळीत थातुर मातुर  कृषि मेळावा घेतल्याचा आरोप  तालुक्यातील आत्मा समितीच्या सदस्यांनी केला आहे.  शेतकऱ्यांसोबत तिन्ही तालुक्यातील आत्मा समितीच्या सदस्यांनाही कृषि विभागाने रितसर निमंत्रण न दिल्याने आत्मा सदस्यांमध्येही रोष पाहायला मिळत आहे.

   स्थानिक संताबाई यादव सभागृहात कृषी विभागातर्फे नुकतेच  चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्याचा मिळून खरीप लागवड पूर्व आढावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मेळाव्याची कुठलीही प्रसिद्धी विभागातर्फे करण्यात आली नाही किंवा गावात दवंडी दिली नाही. त्यामुळे हा मेळावा खरंच शेतकऱ्यांसाठीच होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे. तिन्ही तालुक्याचा मिळून असलेल्या या मेळ्याव्याला अधिकारी, कर्मचारी मिळून केवळ तीनशे ते चारशे शेतकरी उपस्थित असल्याचे समजले. त्यातही नांदगाव,  धामणगाव येथून येणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच खर्च करून या मेळाव्याला उपस्थित राहावे लागले. त्या त्या तालुक्यात मेळावा असता तर शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला नसता असेही मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यावर आत्मा अध्यक्ष यांचे नावही होते, परंतु ती  निमंत्रण पत्रिका अध्यक्ष व सदस्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याची तसदी कृषी विभागाने घेतली नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील आत्मा सदस्यांना या मेळाव्याला उपस्थित राहता आले नाही. या सर्व प्रकारामूळे तालुक्यातील शेतकरी व आत्मा सदस्यांमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळत आहे. सदर प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याचे आत्मा सदस्य केशव वंजारी यांनी सांगितले. हा मेळाव्याचे नियोजन थोडे घाईतच झाले असून याचे नियोजन धामणगाव येथील तालुका कृषी अधिकारी यांनी केले असल्याचे चांदूर रेल्वे येथील तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. केचे यांनी सांगितले.

मेळाव्यासाठी विश्वासात घेतले नाही  – आत्मा अध्यक्ष

कृषी विभागात शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या आत्मा समिती गठीत केली असते. परंतु सदर कृषी मेळाव्यासाठी आपल्याला कृषी विभागाने  विश्वासात घेतले नाही किंवा तारीख हि विचारली नाही. पत्रिकेवर आपले नाव आहे परंतु माझ्यापर्यंत पत्रिकाही पोहचली नाही. अगदी कार्यक्रमच्या  दिवसी तोंडी सूचना दिल्या गेली,  त्या दिवशी नियोजित दुसरे काम असल्यामुळे मेळाव्याला उपस्थित राहता आले नसल्याचे मत तालुक्यातील आत्मा समितीचे अध्यक्ष दादासाहेब निहाटकर यांनी व्यक्त केले.

शेती नसलेल्यांची कार्यशाळेला हजेरी – संतोष घाटोळ

शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाची माहिती सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाने पोहचविणे गरजेचे होते. मात्र शेतकऱ्यांना निमंत्रण न देता कोणालाही फोन लाऊन जवळच्यांना बोलाविण्यात आले. ज्यांच्याकडे शेती नव्हती असेच लोक या मेळाव्याला उपस्थित असल्याची प्रतिक्रिया चांदूर रेल्वे येथील शेतकरी संतोष घाटोळ यांनी दिली. 

विशिष्ट पक्षाच्या मेळाव्याचे स्वरूप – अमोल अडसड

सदर कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा नसुन एका विशिष्ट पक्षाचा मेळावा असल्यासारखा वाटला. कारण वेळेवर विशिष्ट मोजक्याच व्यक्तींना सांगण्यात आले. हा कार्यक्रम नियोजन शून्य असून तीन तालुक्याची कार्यशाळा एकाच शहरात  घेऊन शेतकऱयांना आर्थिक भुर्दंड का देण्यात आला असा प्रश्न पळसखेड येथील शेतकरी अमोल अडसड यांनी उपस्थित केला