आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी – प्लास्टिक आढळून आल्यास दंड आकारला जाईल !

0
1080
Google search engine
Google search engine

 

 

मुंबई – राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २० जुलैपर्यंत स्थगित केली असून सरकारच्या अध्यादेशावर दाद मागण्यासाठी व्यापार्‍यांना ३ आठवड्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा कायदा आजपासून राज्यात लागू होणार आहे.

१. नागरिकांंमध्ये अद्याप सुस्पष्टता नाही !

राज्यसरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा अध्यादेश काढला होता. प्लास्टिक बंदी सरसकट असली, तरी सरकारी सूचनांनुसार सर्व प्रकारच्या पिशव्या, एकदाच वापरण्यात येणार्‍या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यांच्यावर बंदी आहे; मात्र सूचनेनंतर पालट करत पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांना वगळण्यात आल्याने, तसेच उत्पादकांच्या पातळीवर प्लास्टिक पिशव्यांना अनुमती दिली गेली. त्यामुळे नेमक्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे, याविषयी ग्राहकांमध्ये साशंकता आहे.

२. महापालिकेकडून प्लास्टिक गोळा करण्याची योजना !

घरातील प्लास्टिक पिशव्याचे काय करायचे याची नागरिकांना चिंता असून प्लास्टिक गोळा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ३७ केंद्रे चालू केली आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व मंडयांमध्येही प्लास्टिक जमा करता येईल. १० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक गोळा असल्यास महानगरपालिका वाहन पाठवून प्लास्टिक संकलित करणार असून सविस्तर माहितीसाठी १८००२२२३५७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

३. ब्रँडेड मल्टि-लेयर प्लास्टिक आणि काही आस्थापने यांवर बंदी का नाही ?

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी पर्यावरण मंत्रालयाने ब्रँडेड आस्थापनांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात सरकारला पर्यावरणासाठी सर्वाधिक घातक असणार्‍या ब्रँडेड मल्टि-लेयर प्लास्टिकवर बंदी का नाही ? ज्यांच्या उत्पादनासाठीचा प्लास्टिक सर्वाधिक घातक असणार्‍या मोठ्या आस्थापनांवर मेहरबानी का ? असे प्रश्‍न विचारले आहेत.

पंचमहाभूतांचे पूजन करण्याची संस्कृती असल्याने परिस्थिती पालटता येईल ! – आदित्य ठाकरे

‘प्लास्टिक बंदीचा कायदा करणे हे यश नसून त्याची कार्यवाही कशी केली जाते यामध्ये खरे यश आहे. समुद्रात प्लास्टिकची बेटे सिद्ध झालेली पहायला मिळतील. पंचमहाभूतांचे पूजन करण्याची संस्कृती असल्याने परिस्थिती पालटता येईल. दबाव असतांनाही प्लास्टिक बंदीचा निर्णय घेणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचेही कौतुक आहे.’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. प्लास्टिकला पर्यायी वस्तू यासंबंधी आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्लास्टिक आढळून आल्यास पुढीलप्रमाणे दंड आकारला जाईल !

महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी ५ सहस्र, दुसर्‍या वेळी १० सहस्र रुपये, तर तिसर्‍या वेळी पकडले गेल्यास २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आणि ३ मासांची कैद अशी शिक्षा कायद्यात न बसणारे प्लास्टिक वापरल्यास होणार आहे.

बंदी असलेले प्लास्टिक

१. प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या. पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या सर्व पिशव्या.

२. थर्माकोल आणि प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या ताटे, वाट्या, पेले, चमचे,  सजावटीसाठीचे थर्माकोल

३. उपाहारगृहात अन्न देण्यासाठी वापरले जाणारे डबे, स्ट्रॉ, नॉनवोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग (वोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जातात.)

४. नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पिशव्या

बंदी नसलेले प्लास्टिक

१.  उत्पादकांकडूनच प्लास्टिकच्या वेष्टनात येणारे पदार्थ, उदा. ब्रॅण्डेड वेफर्स, चिवडा इ.

२. ब्रॅण्डेड शर्ट, ड्रेस, साड्या यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लास्टिक वेष्टने

३. ब्रॅण्डेड दूध, तेल असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी

४. शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या

५. निर्यात होणार्‍या वस्तूंच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक

६. औषधांसाठी वापरले जाणारे वेष्टन