विज पडुन एक महिला ठार तर दोन गंभीर जखमी – पेरणीकरीता गेल्या होत्या शेतात

0
1047
चांदूर रेल्वे तालुक्याताल निमगव्हाण येथील घटना
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
विज पडून, अति पावसामुळे, पुरामुळे अनेकजण दगावल्याच्या घटना घडत असतांनाच शनिवारी (ता. २३) चांदूर रेल्वे तालुक्यात सुध्दा शेतात पेरणी करिता गेलेल्या एका महिलेच्या अंगावर विज पडुन जागीच मृत्यु झाला असुन दोन गंभीर झाल्याची माहिती आहे.
    प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वेवरून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या निमगव्हाण येथे विठ्ठल मंदिराची शेती असुन त्याची देखभाल, वाई-पेरी गावातीलच शंकर भुते हे करतात. परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे त्यांनी त्या शेतात शनिवारी पेरणीकरीता बैलबंडी, बियाणे, मजुरासह सर्व ताफा नेला होता. यामध्ये सौ. रेखाताई वासुदेव ठाकरे, मिरा रामटेके, गजानन भुते, अलका मोहोड, हनुमंत झाडे, पंचफुला भुते हे शेतात पेरणीकरीता गेले असता दुपारी १२च्या सुमारास ह्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. याच दरम्यान  पेरणी सुरू असतांना सौ. रेखाताई वासुदेव ठाकरे (५०) यांच्या अंगावर विज पडल्याने जागीच ठार झाल्या. तर गजानन भुते व मिरा रामटेके हे गंभीर जखमी झालेले आहे. गंभीर जखमींना तातडीने चांदूर रेल्वे येथील डॉ. जाजु यांच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मृतक रेखाताई ठाकरे यांचे शव विच्छेदनाकरीता चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणले होते. मृतक सौ. रेखा ठाकरे यांच्याकडे स्वत:ची चार एकर शेती असुन त्यांचे पती वासुदेव ठाकरे घरची शेती सांभाळून पती-पत्नी दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात होते. रेखाताई यांना एक विवाहीत मुलगी असुन एक २२ वर्षी निलेश नावाचा अविवाहीत मुलगा आहे. तो निमगव्हाण येथील मदर डेअरी येथे काम करतो.
    शेतात विज पडल्याची माहिती गावात होताच गावातील महिला पुरूषांनी शेतात जाण्याकरीता एकच गर्दी केली होती. तसेच घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे तहसिलदार राठोड यांनी गावाला भेट देऊन विज पडुन मृत्यु झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडुन मिळणारी मदत तातडीने देण्याचे कबुल केले. यासोबतच गंभीर जखमींच्या उपचाराकरीता तत्काळ शासकीय मदत देणार असल्याचे सांगितले. निमगव्हाण या छोट्याशा गावात रेखाताईंच्या आकस्मीत निधनामुळे शोककळा पसरली आहे.