एसपींची दबंग कारवाई, मात्र पोलीस विभागाची कमालीची गुप्तता >< चांदूर रेल्वे येथील जमादाराचे निलंबन प्रकरण

0
866
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
अवैध धंदेवाल्यांसोबत संबंध असल्याचा ठपका ठेवत चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या एका बीट जमादारावर निलंबनाची कारवाई करीत ठाणेदारांचे इन्क्रीमेंट रोखल्याची दबंग कारवाई ग्रामिण पोलीस अधिक्षक यांनी केल्याचे विशेष सुत्रांकडुन समजते. परंतु एवढी मोठी कारवाई एसपींनी केल्यानंतरही स्थानिक व अमरावती येथील ग्रामिण पोलीस विभागाकडुन मात्र कमालीची गुप्तता ठेवल्याने शहरात अनेक चर्चांना उधान आले आहे.
काही दिवसांपुर्वी अवैध धंदे वाल्यांनी तालुक्यातील मांजरखेड तांडा येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यु झाला होता. तसेच एक कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणावरून चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र यानंतरही शहरात अवैध धंदे जोमात सुरूच होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार यांच्या आदेशाने १४ जुन रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पा­लवे यांच्या मार्फत विशेष पोलिस दलाने शहरातील सिनेमा चौक येथे वरली मटक्यावर धाड टाकुन दोघांना अटक केली होती. सदर प्रकरणाची ग्रामिण पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार यांनी कसुन चौकशी केली असता या भागातील बिट जमादार दामोधर उर्फ अण्णा डोंगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर ठाणेदार सुध्दा दोषी असल्यामुळे ठाणेदारांचे इंन्क्रीमेंट थांबविल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु ग्रामिण पोलीस अधिक्षकांच्या अशा दबंग कारवाईनंतर या प्रकरणाची संपुर्ण माहिती देण्यात पोलीस विभागाकडून टाळाटाळ करणे सुरू आहे. स्थानिक पत्रकारांनी सर्वप्रथम ठाणेदार यांना फोन लावल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे सुध्दा याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी पालवे यांना फोन केल्यानंतर त्यांनीही उचलले नाही किंवा पुन्हा फोन केले नाही. काही पत्रकारांनी अमरावती येथील कार्यालयातुन माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथुनही कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडुन पोलीस अधिक्षकांच्या दबंग कारवाईबाबत गुप्तता का बाळगली जात आहे? याचे कारण अजुनही समजलेले नाही.