राममंदिर उभारण्याचे दायित्व संतांनाच घ्यावे लागेल !

0
663

अयोध्येत साधू आणि संत यांनी राममंदिरावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फटकारले !

अयोध्या – योगी आणि मोदी यांचा अंतरात्मा जागा झाला नसला, तरी कोट्यवधी हिंदूंचा अंतरात्मा जागा झाला आहे. आता वाटते की, राममंदिर उभारण्याचे दायित्व संतांनाच घ्यावे लागेल, अशा शब्दांत कन्हैया दास यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपला राममंदिरावरून फटकारले. येथे महंत नृत्यगोपाल दास यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संत समागमामध्ये योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने साधू आणि संत उपस्थित होते. तत्पूर्वी रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांनीही योगी आदित्यनाथ यांना त्यांचे जुने विधान आठवून सांगितले. योगी आदित्यनाथ यांनी पूर्वी म्हटले होते की, जर मी कधी उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री झालो, तर राममंदिर बनवूनच दम घेईन. रामविलास वेदांती पुढे म्हणाले की, आता प्रसारमाध्यमे योगी आदित्यनाथ यांना प्रश्‍न विचारू लागली आहेत. हिंदू त्यांना मंदिर बनवण्याचा दिनांक विचारत आहेत. अशा वेळी सरकार कोणतेही पाऊल उचलणार नसेल, तर संत समाजालाच स्वतः मंदिर बनवण्याचा निर्णय तोही वर्ष २०१९ च्या पूर्वी घ्यावा लागेल. न्यायालयाच्या अनुमतीची प्रतीक्षा न करताच राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ केला पाहिजे.