कामगार पाल्यांसाठी कामगार कल्याण मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

0
1074
Google search engine
Google search engine

कामगार पाल्यांचा प्रशासकीय सेवेत वाढणार टक्का

बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना सुवर्णसंधी

प्रतिनिधी:- नितीन ढाकणे/दिपक गित्ते

परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार पाल्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. कामगारांच्या पाल्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे आणि प्रशासनात त्यांचा सहभाग वाढावा म्हणून कामगार पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे वर्ग सुरू करण्यात येत आहे. नुकतेच शासनाने तसा अध्यादेश काढले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, एमबीए एन्ट्रन्स, पोलिस, तलाठी, लिपिक, टंकलेखक आदी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन होणार आहे. परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार २ ते ८ महिने कालावधीचे वर्ग असणार आहे. यूपीएससी मार्गदर्शन वर्गासाठी नाममात्र ५०० रुपये आणि एमपीएससी व इतर वर्गासाठी २५० रूपये शुल्क आहे. यात विद्यार्थ्यास स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीजचा खर्च मंडळ करणार आहे.
बीड, लातूर आणि उस्मानाबाद अंतर्गत चालणाऱ्या बीड, परळी, अंबाजोगाई, लातूर, उदगीर, निलंगा, उस्मानाबाद, कळंब या कामगार कल्याण केंद्रामध्ये या परीक्षा वर्गासाठी नोंदणी सुरू आहे. पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची चाचणी परीक्षेद्वारे निवड होणार आहे. एका बॅचमध्ये ३० ते ५० विद्यार्थी असून 30% जागा मुलींसाठी राखीव आहे. वर्ग लातूर येथील कामगार कल्याण भावनात सुरू होणार आहे. साखर कारखाने, एसटी महामंडळ, वीज कंपन्या, दूध डेअरी, सहकारी बँका, जीवन प्राधिकरण, पणन मंडळ, विविध कंपन्या, हॉटेल, कापड दुकाने, सूतगिरणी, ऑइल मिल आदी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार पाल्यांना या स्पर्धा परीक्षा वर्गाचा लाभ घेता येईल. या सुवर्णसंधीचा लाभ तीन जिल्ह्यातील कामगार पाल्यांनी घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी मनोज पाटील व परळीचे केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.