चांदूर रेल्वेतील कृषी केंद्रात रेटचे बोर्ड लावण्याचे आदेश द्यावे – शेतकऱ्यांची होणारी फसवणुक थांबवा जनता दलातर्फे जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

0
888
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

         शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विदारक आहे. शेती हे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एकमात्र साधन आहे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी शेतकऱ्यांनी कधी शेती सोडली नाही. बहुसंख्य शेतजमीनी कोरडवाहू पीक निसर्गाच्या लहरीवर पावसावर अवलंबून आहे. अनेकवेळा दुबार पेरण्या, अनेक वेळा नापिकी, उत्पादन बेभरवशाचे एवढे सगळे करूनही पीक आले तर बाजारात पुरेसा दाम नाही. तसेच संरक्षण द्यायला सरकार तयार नाही. अशातच एकीकडे शेतकरी देशोधडीला लागला असतांना मात्र चांदूर रेल्वे तालुक्यातील कृषी केंद्रावर बियाणे, औषधींवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भाव आकारून शेतकर्‍यांची लूट होत आहे. त्यामुळे या लुटीवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक कृषी केंद्रात फिक्स रेटचे बोर्ड लावावे अशी मागणी जनता दल (सेक्युलर) तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

     चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येक कृषी केंद्रात एकाच कंपनीच्या बियाणे, औषधांचे निरनिराळे भाव पहावयास मिळत आहे. फवारणीच्या औषधांची किंमत मनमानी स्वरूपात चांदूर रेल्वेच्या कृषी केंद्रात आकारण्यात येत आहे. वास्तविक पाहता फवारणीच्या अौषधी बॉटलवर खूप मोठ्या प्रमाणात किमती असून व्यापारी जरी त्यात ५०० ते ६०० रुपये किंमत कमी विकत आहे. तरी मात्र त्या औषधीची मुळ फिक्स किंमत किती याचा पत्ता लागत नाही आहे. कृषी केंद्रात प्रत्येक वस्तुवर दाखवायचीच किंमत असून त्यापेक्षा कितीतरी रूपयाने कमी या औषधीची किंमत असण्याची शक्यता आहे. म्हणजेच कृषी औषधींची किंमती फटाक्यांच्या किंमतीसारखी झाली असल्याचे जनता दलाने म्हटले आहे.

     तरी ही शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवून अगोदरच जीर्ण झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा व तालुक्यातील प्रत्येक कृषी केंद्रात फिक्स रेटचे बोर्ड लावावे अशी मागणी जनता दल (से.) ने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, मेहमुद हुसेन, अंबादास हरणे, सुधीर सव्वालाखे, अवधूत सोनवने, साहेबराव शेळके, संजय आंबटकर, धर्मराज वरघट, संजय डगवार, अभिषेक खानंदे, चंद्रशेखर सिरसाट, रमेश गुल्हाणे, रमेश कुबडे, अशोक रोडगे, अशोक हांडे यांसह अनेक कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनाही पाठविले निवेदन

कृषी औषधींवर शेतकऱ्यांची लुटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनता दल (से.) तर्फे निवेदन पाठविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कृषी केंद्रावर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कृषी औषधींवर, बियाणांवर मुळची किंमत छापण्याची संबंधित कंपनीला ताकीद देण्यात यावी म्हणजेच शेतकऱ्यांची लूट होणार नाही अशी मागणी यामधून करण्यात आली.