बापरे बाप… विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन ७ किलो – दप्तरांचे ओझे घटवण्यात चांदूर रेल्वे शिक्षण विभाग ‘नापास’

0
1288
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

     शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे घटवण्यात स्थानिक शिक्षण विभाग नापास झाले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून ठोणतेही ठोस पाऊले उचलेली गेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझांचा मुद्दा तसाच रेंगाळत राहिला असून स्थानिक शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

      राज्याच्या शिक्षण विभागाने २०१५ साली विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे घटवण्याबाबत एक परिपत्रक काढले होते. यानुसार शालेय विद्यार्थ्याच्या एकूण वजनापेक्षा त्याच्या दप्तराचे ओझे एक दशांशपेक्षा जास्त असू नये, असे नमूद करण्यात आले होते. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महिन्याला शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात येण्याचे आदेश होते. परंतु सुरुवातीपासूनच चांदूर रेल्वे तालुक्यात याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठिवरील ओझे कमी होईल असे शिक्षण विभाग वेळोवेळी सांगते. मात्र यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे अद्याप कमी करण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले नाही. जि. प. शाळा वगळता तालुक्यातील शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थी दप्तराचा ५ ते ८ किलोचा भार आजही वाहत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य मार्केट मधील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या शाळेतील ८ व्या वर्गातील विद्यार्थीनीच्या दप्तराचे वजन केले असता ते तब्बल ७ किलो आढळून आले. तर विद्यार्थीनीचे वजन ३३ किलो होते. विद्यार्थीनीच्या वजनानुसार तिच्या दप्तराचे वजन ३ किलोपेक्षा कमी असणे आवश्यक होते. मात्र तसे आढळून आले नाही. ऐवढ्या मोठ्या वजनामुळे अनेक मुले पाठ, मान, मनका दुखत असल्याच्या तक्रारी करतात. सदर विद्यार्थीनीला दप्तरातील एवढ्या मोठ्या असलेल्या बुक-पुस्तकांबाबत विचारले असता तिने सांगितले की, दप्तरातील हे सर्व बुक-पुस्तके शाळेत न्यावेच लागते. नाही नेले तर शिक्षक कोंबडे बनवून ठेवून शिक्षा देत असल्याची धक्कादायक बाब सांगितली. असे असले तरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे घटवण्याबाबत सध्या लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे.

(बॉक्समध्ये घेणे)

शाळेत तपासणी करणार – गटशिक्षणाधिकारी इंगळे

शाळेच्या भेटीदरम्यान आम्ही शंका आली की २ ते ५ टक्के विद्यार्थ्यांचे दप्तर तपासतो. साधारणत: जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ऐवढे वजन आढळत नाही. तालुक्यातील इतरत्र खाजगी शाळेत याबाबत तपासणी करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी सांगितले.