माहिती नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे – सोपान मोरे (पोलिस उपअधिक्षक मुख्यालय)

0
1486
Google search engine
Google search engine

परभणी- पोलिस व प्रशासन पातळीवरील विविध घडामोडींची माहिती पत्रकारांना असते ही माहिती नागरीकांपर्यत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे आहे असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक मुख्यालय सोपान मोरे यांनी केले.

‘फेक न्युज : परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने परभणीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस उपअधिक्षक सोपान मोरे बोलत होते. कार्यशाळेस पोलिस निरीक्षक प्रविण मोरे, माहिती अधिकारी किरण वाघ, जिल्ह्यातील प्रमुख दैनिके व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलिस उपअधिक्षक श्री.मोरे म्हणाले, शासनाच्या पोलिस प्रशासन यंत्रणा प्रत्यक्षात करीत असलेले काम काही घटकापुरते मर्यादीत असते पण पत्रकार व माध्यमामुळे या सगळ्यांची माहिती जनतेपर्यंत जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे योग्य बाबींना स्थान द्यावे असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक प्रविण मोरे म्हणाले, वृत्तपत्रे व माध्यमांबरोबरच समाजमाध्यमांचा वापर वाढतो आहे. अशाप्रसंगी पोलिस विभागाचा ‘सायबर सेल’ यातील समाज विघातक घटनांची सुरुवातीची मुळ लिंक शोधून ती तयार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाते. असे सांगून त्यांनी याबाबत नूकताच एक गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून फेकन्युज बाबत जागृती करणे आणि त्यांची याबाबतची मते जाणून घेण्यात येत आहेत. अशा कार्यात पत्रकारांचे सहकार्य घेण्यासाठी पोलिस विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी देखील सायबर सुरक्षेबाबत पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला होता असेही मोरे यांनी सांगितले.
माहिती अधिकारी श्री.वाद्य म्हणाले, या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. वृत्तपत्रे व प्रसारमाध्यम प्रतिनिधीसाठी कार्यशाळेद्वारे जनजागृती केली जात आहे. ही बाब राज्यातील समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे. असे ते म्हणाले.
यावेळी माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांच्यावतीने वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमाद्वारे होणारे वृत्तांकन, सोशल मिडीया आदिबाबत मत व्यक्त करण्यात आले. तसेच वेबपोर्टलद्वारे चुकीच्या अनधिकृत बातमीपत्रे व वृत्तांचा प्रसाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास राजेश आगाशे, गणेश कौटकर, एकनाथ मुजमुले, मिलिंद तुपसमुद्रे, गंगाधर निरडे, यशवंत वाघमारे, आदि उपस्थित होते.