*’यशाला वय मोठे नाही तर ध्येयवादी वृत्ती पाहिजे’ – श्री सोपान कनेरकर*

0
916

नारायणदास लढा विद्यालयातील विद्यार्थी मनसोक्त हसला रडला आणि अंतर्मुख झाला

लोकमान्य टिळक पुण्यतीथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमीत्त व्याख्यानाचे आयोजन

अमरावती – मनुष्य स्वतःच्या विचाराने घडत जातो. मात्र केवळ मनात विचार असून चालत नाही तर त्याला कर्माची जोड असणे आवश्यक आहे. कर्तृत्वाने यशस्वी झालेल्या माणसाच्या शब्दाने जग संमोहित होते. मात्र कर्म न कळता केवळ विचार बरडणे व्यर्थ होय. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी व इतरांना संमोहीत करण्यासाठी विचारांना कर्माची जोड घ्या.

आज समाजातील प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर किंवा मोठ्या पदावर गेला पाहिजे पण आज बर्याच ठिकाणी शिकलेली मुलं आई वडिलांना घराबाहेर हाकलून देतात. विचाराने अति व्यसनाच्या विळख्यात अटकत आहेत. आत्महत्या करत आहे. इतकंच काय तर असहाय्य मुलींवर अत्याचार करीत आहे. म्हणून आपल्या मुलाला जीवनाच्या शाळेत वास्तवतेचे दर्शन घडवून एक आदर्श चरित्रसंपन्न, संस्काराक्षम माणूस घडवण्यासाठी पालकांनी लक्ष द्यायची आज खरी गरज आहे. असा ख्यातनाम युवा वक्ते सोपान कनेरकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.

नारायणदास लढा विद्यालय रवी नगर अमरावती येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमीत्त ‘बालक पालक’ या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक झंवर मॅडम, प्रदीप मुघल व शिक्षक वर्ग तथा पालक वर्ग उपस्थित होता.

कनेरकर पुढे म्हणाले की, आज माणूस पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागून माणूसपण हरवून बसला आहे. मनमुराद हसू शकत नाही. इतकंच काय मनमोकळं रडू शकत नाही. सगळं काही नाटकी झालं आहे. संवेदना बोथड झाल्या आहे. यासाठी आज माणूस घडविण्यासाठी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. लहानपणापासून मुलाकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार दिले तर माणूस बनायला वेळ लागणार नाही.

व्याख्यानादरम्यान कनेरकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना खिळवून ठेवले. आपल्या डोक्यात येणारे विचार क्रियेला प्रेरित करतात. त्यामुळे समाज किंवा इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. एखाद्या घटनेनंतर निराश होणारे त्यांच्या नकारात्मक विचाराने आत्महत्या करतात मात्र सकारात्मक विचार करणारे त्या अपयशातून नवा मार्ग शोधतात. हरलो याचा विचार करणारे संपतात.

मात्र सकारात्मक विचार करून संघर्षाचा मार्ग निवडणारे जिंकत असतात. महान व्यक्तींनी स्वतःच्या विचारातूनच ही शक्ती मिळवून यश संपादन केले आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीत विचारात शक्ती असेल तर शरीरात शक्ती निर्माण होईल. पक्ष्यांप्रमाणे विचार करणारे राईट बंधू, कोलंबस, एडिसन किंवा वाळू असलेल्या वाळवंटात बुर्ज खलिफासारखी इमारत निर्माण करण्याचा विचार करणारे अभियंता महान होते. प्रत्येक वेळी प्रेरणास्रोत असेलच असे नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःची प्रेरणा होणे आवश्यक आहे. स्वतःला जिंकताना पाहण्याचा आत्मविश्वास जगात सर्वात मोठा असतो. हा मूलमंत्र त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केला.

अपयशाची भीती न बाळगता, विचारांना कृतीची जोड मिळने आवश्यक आहे. वाईट दिवसाच्या काळात लोकांनी सचिन तेंडुलकर वर व युवराज सिंग यांच्यावर टीका केली. मात्र त्यांनी आपल्या कर्माने टिकाकारांचे तोंड बंद केले. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने इतरांचे तोंड बंद करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.