अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्या – डॉ. सुनील देशमुख

0
732
Google search engine
Google search engine

पाटबंधारे महामंडळाची आढावा बैठकभूसंपादन, पुनर्वसनाबाबत सूचना
अमरावती-: संरक्षित सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर मर्यादा येते. हे लक्षात घेऊन शाश्वत सिंचन सुविधांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गती देण्याचे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी येथे दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.श्री. देशमुख म्हणाले की, अमरावती विभागात एकूण 108 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी नियोजित 22 हजार 175 हेक्टर जमिनीपैकी 9 हजार 894 हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे कार्य संयुक्त मोजणीद्वारे संबंधीत शासकीय यंत्रणेने समन्वयातून करावे. जमिनीच्या मोबदल्यासह प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन आणि पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पर्यायी जागेवर किंवा गावठाण जमिनीवर पुनर्वसन करावे. पुनर्वसित क्षेत्रात पिण्याचे पाणी, विद्युतीकरणाची कामे, वाहतुकीसाठी रस्ते आदी मुलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात. प्रकल्पांच्या कामांबाबतचा तक्ता तयार करुन महामंडळास सादर करावा, तसेच ज्याठिकाणी पाणीसाठा निर्माण झाला आहे, त्याठिकाणी बंद पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. बैठकीत चर्चा केलेल्या प्रकल्पांची कामे उत्कृष्ट नियोजनातून पूर्ण करावीत, असेही डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.बैठकीला विभागातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन अधिकारी, भूमी अभिलेख, नगररचना, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.