सनातन संस्थेला अडकवण्यामागे मोठे षड्यंत्र; मात्र शिवसेना सनातनच्या पाठीशी ! – खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना, अमरावती

0
1267
Google search engine
Google search engine

 

अमरावती – सध्या चालू असलेल्या सर्व घडामोडी पाहिल्यावर सनातन संस्थेला अडकवण्यामागे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. मी स्वतः पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सनातनवर बंदीची कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती करणार आहे. तसेच सनातन संस्थेसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटना कोणताही राजकीय उद्देश न ठेवता नि:स्पृहपणे कार्य करत आहेत. खरेतर अशा संस्थांना हिंदुत्वनिष्ठ शासनाने साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः खासदार म्हणून, तसेच आमचा शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे अमरावती जिल्ह्यातील खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीच्या वेळी बोलत होते.

या वेळी सनातन संस्थेचे अमरावती येथील श्री. हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि समितीचे प्रसिद्धीसेवक श्री. जय देशमुख या वेळी उपस्थित होते. या वेळी खासदार श्री. अडसूळ यांना ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी आणण्यात येऊ नये’, या विषयीचे निवेदन आणि अन्य पुरावे दिले.

या वेळी समितीचे प्रवक्ते श्री. पानसरे यांनी खासदार महोदयांना माहिती देतांना सांगितले, ‘‘सध्या नालासोपारा आणि पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि संस्थेचे साधक यांना नाहक गोवले जात आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यापूर्वी आपचे नेते आशिष खेतान यांनी ट्वीट करून माहिती दिली होती, म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना आधीच माहिती देऊन सनातनची अपकीर्ती करण्याची संधी दिली. डॉ. दाभोलकर खटल्यात आधीच्या आरोपींची नावे वेगळी आणि आता पकडलेले आरोपी निराळे आहेत. इतकेच नव्हे, तर मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय देतांना सनातन संस्थेला जाणीवपूर्णक गोवण्यासाठी प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) सिद्ध करण्यात आल्याचे म्हटले आहे.’’

यावर खासदार श्री. अडसूळ म्हणाले, ‘‘हे मोठे षड्यंत्र आहे. खरे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सत्ताधारी भाजपने साहाय्य करायला हवे; मात्र सनातनला साहाय्य होतांना दिसत नाही. तुमच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांमुळे धर्माचे कार्य चालू आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षांना बळ मिळत आहे. शासनाने तुम्हाला साहाय्य करायला हवे, यासाठी मी प्रयत्न करीन. तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्पृहपणे करत असल्यामुळे तुम्हाला हा लढा द्यावा लागणार आहे; मात्र आम्ही तुमच्या समवेत आहोत. आमचा शिवसेना पक्षही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. तुमच्या बाजूने लढण्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.’’