पाण्याच्या लोखंडी पाईपचा करंट लागुन पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा मृत्यु – बग्गी येथील घटना ड्युटीवर असतांना झाले निधन

0
864
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा विहीरातील पाण्याच्या लोखंडी पाईपचा करंट लागल्यामुळे ड्युटीवर असतांनाच निधन झाल्याची दुख:द घटना शनिवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.
चांदूर रेल्वेवरून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बग्गी गावाला गावातीलच ग्रामपंचायतच्या विहीरीने पाणीपुरवठा करण्यात येतो. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शनिवारी (ता. २५) पाणी पुरवठा कर्मचारी वसंत दमडाजी कासार (वय ५२) यांनी सकाळी गावातील प्रथम एका वार्डाचा पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर सकाळी ११.४० वाजता पाण्याची मोटार सुरू केली. विहीरीतील पाईपने जनावरांकरीता असलेल्या हौदामध्ये पाणी येत असतांना पाईपला अचानक करंट आला. सकाळी ११.४५ वाजता पाईपला वसंत कासार यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना धक्का बसला व ते हौदामध्ये फेकल्या गेले. सदर बाब गावातील काही नागरीकांना कळताच त्यांनी लगेच हौदामधुन त्यांना बाहेर काढले व चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर स्थानिक ग्रामिण रूग्णालयातच त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. वसंत कासार यांच्यामागे पत्नी, १ विवाहीत मुलगा – मुलगी व १ अविवाहीत मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते जवळपास १२ वर्षांपासुन पाणी पुरवठा कर्मचारी म्हणुन कार्यरत होते. त्यांची विवाहीत मुलगी एका दिवसापुर्वीच रक्षाबंधनाकरीता बग्गी गावी आली होती. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे, मनमिळावु वृत्तीचे वसंत कासार यांच्या अचानक मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे. वसंत कासार यांच्या कुटुंबियांना तत्काळ शासकीय मदत देवुन एका मुलाला नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी केली आहे.