चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीनचे पिक ऑक्सिजन वर – पीक कर्जाची परतफेड करणे होणार कठीण

0
853
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- ( शहेजाद  खान) 
      गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या डोलात उभे असणारे सोयाबीनचे हिरवेगार पीक पावसाच्या दीर्घ खंडामुळे या आठवड्यात पिवळे होऊन वाळतांना दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत पडलेला आहे.
   चांदूर रेल्वे तालुक्यात जूनच्या सुरवातीला चांगल्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी वेळेवर करता आली आणि पीक चांगले उगवले. त्या नंतर सुद्धा पाऊस हा चांगला आला, मात्र जुलै च्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरू झाला. परंतु त्या काळात सोयाबीनचे पीकांची जोमात वाढ झाली आणि फुले ,शेंगा चांगल्या आल्या. असे असतांना सोयाबिनच्या शेंगा भरण्यासाठी पाण्याची गरज असताना गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उभे हिरवेगार पीक पिवळे होऊन सुकत चालले आहे व शेंगातील दाणे हे पूर्ण बारीक अवस्थेत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेला आहे.
 गेल्या दोन वर्षां पासून पाऊस नसल्याने सततच्या नापिकीला शेतकरी सामोरे जात आहे. सोबतच शेतमालाचे कमी होत चाललेले बाजार भाव, शासनाचे शेतकऱ्यांसाठीचे चुकीचे धोरण यामूळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दोन वर्षात आधीच  कर्जात डुबलेला शेतकरी या वर्षी पिककर्ज कसा भरेल याची चिंता त्याला लागली आहे. काही शेतकऱ्यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेऊन आपली शेती उभी केली, मात्र पाऊस नसल्याने त्याचे डोळे आभाळाकडे लागले आहे.
शासकीय यंत्रणा झोपेत
    दोन महिन्यांपासून पावसाचा लपंडाव सुरू असतांना शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे वाळत चालले आहे. पण शासकीय यंत्रनेकडून अजून पर्यंत त्याची पाहणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्याला मार्गदर्शन नाही, पीक विम्यातून त्याला मदत होईल पण त्यासाठी त्याला काय करावे लागेल हे शेतकऱ्याला कोण सांगेल असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
 मी कर्ज कस भरू
     शासनाच्या कर्ज माफीमध्ये माझे कर्ज माफ झाले नाही आणि या वर्षी नवीन कर्ज पण मिळाले नाही. सोयाबीन पावसाअभावी सुकत असल्याने पीक होणार नाही मग मी कर्ज कस भरू ?  –अमोल नाखले युवा शेतकरी
सोयाबीन कापणीची गरज नाही
   महिन्या भऱ्यापासून पाणी नसल्याने सोयाबीन च्या शेंगा पूर्ण पोचट आहे आणि पोचट शेंगांचे झाड पिवळे होऊन वाळत चालले मग सोयाबीन सोंगून काही फायदा नाही.-  उत्तम शेलोकर शेतकरी
पीक विम्याची माहिती कोण सांगेल ?
    मागील वर्षी मी सोयाबीन चा पीक विमा काढला होता माझे सोयाबीन चे पीक पूर्ण वाळले होते. त्याचा पाठपुरावा कुठं कराचा हे कोणी सांगितले नाही आणि याहीवर्षी पीक विमा काढला सोयाबीन वाळत आहे पण कोणतीच शासकीय यंत्रणा मार्गदर्शन करत नाही. पीक विमा फक्त कंपनीसाठीच आहे शेतकऱ्यांसाठी नाही. – गुड्डू पठाण शेतकरी