बौद्ध शिक्षक २५ वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती होती ! – तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा

0
1158
Google search engine
Google search engine

 

नवी देहली – अनेक बौद्ध शिक्षक महिलांचे लैंगिक शोषण करतात, हे मला वर्ष १९९० पासून ठाऊक आहे, असा गौप्यस्फोट तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी नेदरलॅण्डच्या दौर्‍याच्या वेळी केला. या वेळी त्यांनी पीडित महिलांचीही भेट घेतली. या पीडित महिला अनेक वर्षांपासून दलाई लामा यांच्या भेटीची वाट पहात होत्या. त्यासाठी त्यांनी लामा यांच्याकडे याचिकाही केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘जेव्हा आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा आम्हाला मोकळ्या मनाने स्वीकारले गेले; मात्र त्याच्या नावाखाली आमच्यावर बलात्कार होऊ लागले आणि लवकरच आमचा भ्रमनिरास झाला.’

दलाई लामा यांना या महिलांनी केलेल्या आरोपाविषयी विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, मला हे पूर्वीपासून ठाऊक होते. त्यात नवीन काही नाही. २५ वर्षांपूर्वीच मी याविषयी म्हटले होते. जे असे प्रकार करतात ते भगवान बुद्धांच्या शिकवणीची अवहेलना करत आहेत. सध्या जे काही उघड झाले आहे ते आमच्यासाठी लज्जास्पद आहे.

युरोपमधील शरणार्थींना एक दिवस त्यांच्या देशात परत जावे लागेल !

दलाई लामा यांनी युरोपमध्ये शरण घेतलेल्या मध्य-पूर्वेतील मुसलमानांविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर सांगितले की, युरोप सर्वप्रथम युरोपमधील देशांचा आहे. येथे येणार्‍या शरणार्थींना त्यांनी आश्रय दिला आहे; मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवे की, त्यांना एक दिवस परत त्यांच्या देशात जायचे आहे.