दिगंबर शेळके (वय ४२) हे रविवारी पहाटे आसाम येथे शहीद झाले.

0
1117
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

येवला तालुक्यातील मानोरी येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) हे रविवारी पहाटे शहीद झाले.आसाम येथील संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. मात्र कुटुंबियांनी दिगंबर असे करूच शकत नसून हा घातपात असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आज सोमवारी येथे आलेले पार्थिव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे.
– आसाम मधील तेजपुर येथे रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान ते शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. हे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. काल दिवसभर मानोरी गाव शोकमग्न होते. गावात स्मशान शांतता पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
दिगंबर शेळके यांची तेथील अधिकाऱ्यांनी स्टोर किपर म्हणून नुकतीच काही महिन्यांपूर्वी नेमणूक केलेली होती. मात्र या स्टोरच्या हिशोबाबाबत गोंधळ असल्याने २०१४ पासून चौकशी सुरू होती. याबाबत शनिवारी रात्री दिगंबर त्यांच्या मेव्हण्यांशी याविषयी बोलले होते. वार्षिक तपासणी सुरू असल्याने या हिशोबाचे काळजी दिगंबर यांनी बोलून दाखवली होती. मात्र त्यांचा मूड चांगला असल्याचे पत्नीने त्यांच्या बोलण्यातून सांगितले.
हे बोलणे झाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी गोळी झाडून घेतल्याचा निरोप आल्याने सगळेच सुन्न झाले. नक्कीच या घटनेत घातपाताचा संशय असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी थेट गृहमंत्री, मुख्यमंत्री व संबधीतांना पत्र पाठवून या प्रकाराची चौकशी करण्याची व दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.संपूर्ण गाव देखील कुटुंबासोबत असल्याने येथे आज सकाळी तणावाचे वातवरण होते. गुवाहाटी येथून आज सकाळी मृतदेह येथे पोहोचला आहे. मात्र,ग्रामस्थ व नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवला आहे. नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.