जिहादी भावनेशी खेळ ?

0
817
Google search engine
Google search engine
   पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय सैनिकाची हत्या करून त्याच्या देहाची क्रूर विटंबना केली. सर्जिकल स्ट्राईकला २ वर्षे पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी हा प्रकार करून पाकिस्तानने पुन्हा एकदा राक्षसी वृत्ती दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संमेलनाच्या वेळी होणारी भारत-पाकिस्तान द्विपक्षीय चर्चा भारताने रहित केली, तर सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी “पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे” असे विधान केले. एकीकडे शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या जात असतांना दुसरीकडे आशिया कपसाठी भारत पाकिस्तानसह चेंडूफळी खेळत होता. जेव्हा शत्रूराष्ट्राला नामोहरम करण्याची जिद्द आणि दूरदृष्टी यांची वानवा असते, तेव्हाच अशा गोष्टी घडतात. भारताला कप (चषक) हवा आहे कि काँकर (युद्धात विजय) हवा आहे, हे ठरवण्याची आज आवश्यकता आहे; कारण आतंकवाद्यांशी खेळ खेळला जाऊ शकत नाही. त्यांच्याशी केवळ युद्ध होऊ शकते. 
 
जिहादी पाकिस्तान !
           पाकिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढणार हे स्पष्टच होते; कारण इम्रान खानच्या रूपाने पाकिस्तानी लष्कराचे बाहुले सत्तेत आले होते. आतंकवादी बुरहान वाणी याचे टपाल तिकीट काढून पाकिस्तानने त्यांची रणनीती पुन्हा एकदा सूचित केली आहेच; पण भारत कडक निषेध, चेतावण्या, सर्जिकल स्ट्राईकचे गोडवे यांतून बाहेर पडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार का, हा खरा प्रश्न आहे. आतंकवाद्यांचे उघडपणे उदात्तीकरण करून काश्मीरसाठी लढणाऱ्या आतंकवाद्यांना पाकिस्तान जर शहिदाचा दर्जा देऊ धजावत असेल, तर ते भारताच्या खमकेपणावर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जिहादी पाकिस्तानच्या नांग्या ठेचायच्याऐवजी शांतीची कबुतरे उडवणारे शासनकर्ते मिळाल्यामुळेच पाकिस्तानची मग्रुरी वाढली आहे. जिहादी मनोवृत्ती आणि हिंदुद्वेष हीच काश्मीरची मुख्य समस्या आहे; मात्र दुर्दैवाने ”विकास झाला म्हणजे काश्मीरची समस्या सुटेल”, अशा भ्रमात सत्ताधारी वावरत आहेत. कोणत्याही युद्धाविना भारतीय सैनिकांचे प्रतिदिन मुडदे पडत असूनही त्यावर कायमची उपाययोजना केली जात नसेल, तर एके काळी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करण्याचा शासनकर्त्यांना अधिकार उरतो का ? ज्यांना सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करण्याची इच्छा आहे, त्यांना यावर्षी युद्ध करण्याची इच्छा नाही, हेही तितकेच स्पष्ट होते
 
जशास तसे कधी ? 
      पाकिस्तान एक आतंकवादी देश आहे. काश्मीरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आतंकवाद्यांचे पाकिस्तानकडून उदात्तीकरण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानकडून होणाऱ्या आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. चीनचीही पाकिस्तानला साथ आहे. “पाकिस्तानला यापुढे आमच्या कृतीतूनच प्रत्युत्तर दिले जाईल”, असे भारतीय सैन्याच्या वतीने सांगण्यात येत असले, तरी ते कधी याविषयी प्रश्नचिन्ह आहे. हुतात्मा भारतीय सैनिकांचे कुटुंबीय आज पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी करत आहेत; पण ती मागणी हवेतच विरून जाते. ज्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज, अटकेपार झेंडा फडकवणारे बाजीराव पेशवे यांचा वारसा आहे, त्या विशाल भारत देशाला छोट्याशा पाकिस्तानचा प्रश्न ७१ वर्षे सोडवता येत नाही, हे लाजिरवाणे आहे. राज्यकर्ते, जनता यांच्यामध्ये असणारी शौर्यजागरणाची भावना क्षीण झाल्यानेच ही अवस्था आहे.
 
शांततेसाठी युद्ध !
    “पाकिस्तानी सैन्य सक्षम आहे; पण जनतेच्या हितासाठी शांतीच्या मार्गावर चालण्यास प्राधान्य देत आहे”, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी सैन्याने केली. भारतातील पाकिस्तानचे हस्तकही त्यांच्या पद्धतीने मानवाधिकार, शांतता, चर्चा अशी भाषा करत असतात; पण शांतता रहाण्यासाठीच युद्ध आवश्यक आहे, हे भारताने निश्चित करण्याची आवश्यकता आहे. भारतीय सैन्याने आतापर्यंत त्यांचे सामर्थ्य सिद्ध केले आहे. शत्रूराष्ट्राला नामोहरम करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या सक्षम शासनकर्ते असतील, तर शत्रूराष्ट्रावर वचक बसवणे अवघड नाही; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची “मन की बात” ऐकून त्याप्रमाणे निर्णय घेतील का, हीच शंका आहे. 
 
       खरेतर एशिया कपमध्ये पाकिस्तानशी क्रिकेटची युद्ध करण्यापेक्षा युद्धातील कायमस्वरूपी विजय भारताला आवश्यक आहे. म्हणूनच ‘कप’ की ‘काँकर’ हे भारत शासनाने ठरवले पाहिजे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 7775858387