राज्यात पेट्रोल ₹ ५ रु. स्वस्त, जनतेला दिलासा

0
1261

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – केंद्र सरकारने ₹ २.५० रु. ची कमी केल्यानंतर राज्य सरकारने ₹ २.५०  रु. ची कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोल ₹ ५  रु. स्वस्त झाले असून, जनतेला मोठा दिसला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशांतर्गत याचा प्रतिकूल परिणाम होऊन जनतेला त्याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली. तसेच, राज्यांनीही आपला वाटा म्हणून इंधनावरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अडीच रुपयांची कपात करावी, असे आवाहनही जेटली यांनी केले आहे. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये ₹ २.५० रु. कपात केल्याची घोषणा केली आहे. केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्कात १.५० रु. प्रतीलिटर, ऑईल कंपनीने आधारभूत किंमतीत  ₹ १ रु. प्रतीलिटर आणि राज्य शासनाने मूल्यवर्धित करात ₹ २.५०  रु. प्रती लिटर कपात केल्याने राज्यात आता पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे सर्वसाधारणपणे ₹ ५ रुपये ६० पैशांनी कमी होतील. पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात प्रती लिटर ₹ २.५० रु. कपात करण्याच्या निर्णयाची अधिसूचना वित्त विभागाकडून निर्गमित होत आहे. यामुळे राज्याच्या महसुलात प्रतीवर्ष ₹ १५६० कोटी रुपयांची घट संभवते. या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले आहेत.