नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा – भाजपा गटनेता संजय मोटवानी यांची पत्रकार परिषदेतुन मागणी

0
1011
शहरात घंडागाडी, नाली साफसफाई बंद
घरांघरांत कचऱ्यांचे साचले ठिगारे
नागरिकांच्या आरोग्याविषयी दुर्लक्षीत बाबी कदापी खपवुन घेणार नसल्याचा इशारा 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
      अमरावती जिल्ह्यात सगळीकडे डेंग्युच्या साथीचे थैमान माजले आहे. या आजाराने अनेकांचे बळी सुध्दा घेतलेले आहे. याशिवाय अस्वच्छतेमुळे बऱ्याच लोकांना निरनिराळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे विदारक चित्र अनेक ठिकाणी असतांना मात्र चांदूर रेल्वे नगर परीषद मुख्यत: स्वच्छतेकडे लक्ष देत नसुन एकप्रकारे जनतेच्या जिवाशी खेळत आहे. त्यामुळे याला दोषी नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी असल्याचा आरोप करीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा गटनेता संजय मोटवानी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतुन केली आहे.
       यावेळी संजय मोटवानी यांनी सांगितले की, चांदूर रेल्वे शहरातील जनतेने मोठ्या आशेने व सन्मानाने नगराध्यक्ष यांना निवडुन दिले होते. परंतु या आशेवर ते खरे उतरलेले नाही. चांदूर रेल्वे शहराला सद्यस्थितीत निरनिराळ्या समस्यांना ग्रासले असुन त्यावर तोडगा काढण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहे. यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे शहरातील अस्वच्छता. शहरातुन दररोज सकाळी फिरून घरांघरातील कचरा गोळा करणारी कचरा गाडी गेल्या ४ दिवसापासुन बंद असुन घरांघरांत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या साचलेल्या कचऱ्यामुळे काही नागरिकांना अनेक आजाराने ग्रासले आहे. शहरातील नाली साफसफाई सुध्दा बंद असुन नाल्यांमध्ये प्रचंड गाळ जमा झालेला आहे. सदर दोन्ही काम संबंधित ठेकेदाराने १ ऑक्टोबर पासुन ५ महिण्यांचे देयके न मिळाल्याने बंद केल्याचे पत्र मिळाले. सदर ठेकेदाराकडुन प्रशासनातर्फे लेखी स्वरूपात वाढीव मुदत देऊन काम करवून घेतले. मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडुन नगराध्यक्षांनी वाढीव मान्यता अजुनही आणलेली नाही. ही मुख्यत: जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे. परंतु वाढीव मुदतीची मान्यता न आणल्यामुळे ठेकेदाराचे ५ महिण्यांचे देयके अडकलेले आहे. त्यामुळे ठेकेदार पुढील काम करण्यात असमर्थ असल्याचे म्हटले. परंतु नगर परिषदच्या या बेजबाबदारपणाच्या कारभाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. २ ऑक्टोंबरला गांधी जयंती निमित्य गावोगावी स्वच्छता अभियानाची जनजागृती करून स्वच्छता अभियान राबविले जाते. परंतु चांदूर रेल्वे शहरात साफसफाई न करता कचऱ्यांचे मोठे ढीग पहावयास मिळाले. शहरात साफसफाई न करता बाहेर स्मशानभुमीत साफसफाई करून नगर परिषदेने काय सिध्द केले हे कळनासे झाले असल्याचेही भाजपा नगरसेवकांनी म्हटले.
     याशिवाय १.५० ते १.७५ कोटींच्या एकुण ३४ कामांची निवीदा प्रसिध्द करून निविदा भरणे ६ ऑगस्टपासुन सुरू झाले होते. २५ ऑगस्ट रोजी सदर निवीदा उघडण्यात सुध्दा आल्यात. मात्र तेव्हापासुन आजवर अजुन एकाही कामाला सुरूवात झालेली नाही. तसेच सर्वसाधारण, विशेष सभेत बरेच ठराव घेण्यात येतात. परंतु या ठरावावर अंमलबजावणी करण्यात येत नसुन यावर सत्ताधारी सुध्दा लक्ष देत नाही. एकुणच म्हणजे नगर परिषदमध्ये एकही काम व्यवस्थित होत नसुन या सर्व गोष्टींना नगराध्यक्ष जबाबदार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या असुन आरोग्याच्या दृष्टीने कर्तव्यात कसुन करणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात यावे अशी मागणी गटनेता संजय मोटवानी व भाजपा नगरसेवकांनी केली आहे. नगर परिषदने स्वच्छतेवर तत्काळ जागे होऊन कठोर पाऊले उचलावी अन्यथा स्वच्छतेविषयी व नागरिकांच्या आरोग्याविषयी दुर्लक्षीत बाबी कदापी खपवुन घेणार नसल्याचा इशाराही संजय मोटवानी यांनी दिला. या पत्रकार परिषदेला भाजपा नगरसेवक अजय हजारे, सौ. सुरेखा तांडेकर, सौ.दिपाली मिसाळ, विजय मिसाळ आदींची उपस्थिती होती.
आरोग्य सभापतीही दोषी – सौ. सुरेखा तांडेकर
    आरोग्य, शिक्षण व स्वच्छता समितीची गेल्या ५ महिण्यापासुन सभा झालेली नाही. आधिच शहरात अस्वच्छतेचा कळस गाठला असतांना याच समितीची सभा न होणे कितपत योग्य ? गेल्या काही दिवसांपासुन दवाखान्यातील रूग्णांची संख्या दुप्पटीने झाली आहे,  त्याचे कारण म्हणजेच शहरातील अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य. एकुणच म्हणजे केवळ सदर समिती कागदोपत्रीच असुन सभापतींना याचे काहीही घेणे – देणे नसल्याचे दिसते. त्यामुळे समितीची जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ ठरल्यामुळे आरोग्य सभापती सौ. स्वाती माकोडे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा द्यावा असे मत या समितीच्या सदस्या सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी म्हटले.