उद्यापासून गुरू तुळेतून वृश्चिकेत – जाणून घ्या गुरू राशी बदलाचे बारा राशींना फळ

0
1457
Google search engine
Google search engine

 

 

11 ऑक्टोबर रोजी गुरू तुळेतून वृश्चिकेत जातोय, वृश्चिक राशी म्हणजे काळपुरुष कुंडलीत अष्टमातील राशी, गुप्तता, गूढ ज्ञान, अध्यात्म, भावणीकता. गुरू म्हणजे सूर्यमालेतील मोठा ग्रह, ज्ञान, शिक्षक, देवगुरु, भव्यता, वैभव, धर्म, अंतर्ज्ञान, या सर्व गोष्टी गुरूच्या कारकत्वात येतात. आज राशिभविष्य देतोय ते तुमच्या जन्मराशीला म्हणजेच चंद्र राशीला अनुसरून नसून जन्म लग्न राशीला अनुसरून आहे, तुमची जन्मलग्न राशी काय आहे हे आधी माहीत करून घ्यावे व नंतर पुढील राशीभविष्य वाचावे. लग्नस्थान हे अत्यंत महत्वाचे स्थान आहे, या स्थानावरून म्हणजेच प्रथम स्थान वरुन व्यक्तीचे स्वरूप, ठेवण, रोगप्रतिकार शक्ती, व्यक्तिमत्व, स्वभाव, प्रकृती, ठेवण, चारित्र्य बघतात. गुरुचे राशी बदल झाल्यानंतर त्याचा सर्व राशीवर प्रभाव दिसून येतोच, पण हा प्रभाव जास्त तेव्हा दिसून येईल जेव्हा जातकाच्या कुंडलीत गुरू ची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल. गुरूच्या तीन दृष्टी असतात, त्या पाच – सात – नऊ अशा आहेत. गुरू पत्रिकेत ज्या स्थानी असेल तेथून पाचव्या सातव्या व नवव्या राशीला पाहतो, त्या स्थानाला शुभता प्रदान करतो, त्या स्थानाची वृद्धी करतो. वृश्चिकेत असतांना पाचवी दृष्टी मीन, सातवी वृषभ व नववी कर्क राशीवर पडते. तर चला पाहुयात बारा राशींचे फल आणि उपाय.

मेष

मेष रास ही अत्यंत शीघ्रकोपी, कफ प्रवृत्ती, गुणवान, जहाल, संघर्षप्रेमी, स्वपराक्रमी व यश मिळवणारी आहे, यांची दृष्टी भेदक व उग्र असते, केस पिंगट कुरळे, भुवया दाट, डोके व तोंड यावर व्रण, ताठ मान, स्वाभिमानी, असे मेषेचे जातक असतात. मेषेचा गुरू भाग्य आणि व्यय स्थानाचा स्वामी गुरू असून अष्टमात येतोय. भाग्येश अष्टमात येणे तसे अशुभ आहे, भाग्यभंग योग तयार होतोय. संवाद कौशल्यात अडचणी येऊ शकतात. कोणाच्या आधीन काम करताना तणाव जाणवेल. नौकरीच्या जागी बॉस कडून त्रास झाल्यास नौकरी सोडून स्वतः चा व्यवसाय करावा असे मनात येईल. पैतृक संपत्तीत वाद विवादाची शक्यता, वडिलांची तब्येत बिघडू शकते, खर्च वाढू शकतात, आतापासून खर्चावर नियंत्रण ठेवावे. स्वतः परेशान असून दुसर्यांना मदत कराल. संपत्ती विकायची असल्यास योग्य वेळ. विद्यार्थ्यांना डिसेंम्बर पर्यंत काळ थोडासा अवघड असेल, त्यानंतर जबरदस्त कालावधी असेल. फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा असणाऱ्यांना अत्यंत उच्च श्रेणीत गुण मिळतील. आईची प्रकृती उत्तम राहील, आईचा भाग्योदय होईल, स्वतः च्या प्रकृतीकडे लक्ष्य द्यावे.
शुभ अंक 2
शुभ रंग निळा, पिवळा, उपाय बारा राशी नंतर दिला आहे.

वृषभ

या लग्न राशीवर गुणी, गुरू व देव यांच्यावर श्रध्दा असलेले लोक जन्मतात, पित्त प्रकोपाने पीडा होते. वृषभ ही शुक्राची रास असल्याने या राशीच्या व्यक्तीमध्ये सौंदर्य असते, मध्यम उंच, गौरवर्ण, तेजस्वी चेहेरा, कांतीमान, मोहकता, रुंद कपाळ, काळे केस असं व्यक्तिमत्व. स्वच्छतेची व टापटीपतेची आवड,संगीत कला गायन खेळ यांत विशेष रस. स्थिर, आळशी, सुखी, ऐशारामी, दागदागिने व सुंदर कपड्यांची आवड असणारे असतात. दातात पु होणे, गळा जीभ मान यांचे विकार होण्याची शक्यता असते.
या राशीला गुरु अष्टम व लाभ या स्थानाचा स्वामी असून सप्तमात प्रवेश करत आहे. या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल, व्यापारात प्रगती होईल, विविध लाभ होतील, विचार सकारात्मक राहतील. विवाहयोग्य व्यक्तींना पुढील वर्ष चांगले. विवाहाचे योग आहेत. रिलेशनशिप मध्ये यश व आनंद मिळेल, वडिलांना आर्थिक फायदे होतील, आईचे खर्च वाढू शकतात, लहान भावंडाना फायद्याचा काळ. स्वतः ची प्रकृती उत्तम राहील. सर्व प्रकारे या राशीच्या जातकांना पुढील काळ अत्यंत शुभ राहणार . विध्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल. कुशलता वाढेल.
शुभ अंक २,३ 
शुभ रंग- हिरवा, पिवळा

मिथुन

या लग्नावर जन्म झालेल्या व्यक्ती धनधान्य संपन्न, बुद्धीचातुर्य, उदार अंतःकरणाच्या, चांगल्या वर्तणुकीचा पुत्र असलेल्या, सुशील, बुद्धिमान, चतुर, प्रसन्न व गोड बोलणारे असतात. ही राशी द्विसभाव राशी आहे व राशी स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्ती उंच , सडपातळ, उभट चेहेरा, सरळ नाक, तांबूस डोळे, असे असतात. यांचा स्वभाव बोलका असतो. विनोदी, चंचल, अष्टपैलू व्यक्तिमत्व असते, विद्वान व विद्याव्यसंगी असतात.
या राशीला गुरू जया भाव व कर्म भावाचा स्वामी असून षष्ठ स्थानी प्रवेश करत आहे. नावलौकिक व प्रसिद्धी होईल, व्यापारात व्याप वाढेल, वाहन व घर खरेदी होईल, नौकरी करत असल्यास कामाचा व्याप वाढेल, विवाह सुख मिळेल. बँकेत पैसे जमा होतील, खर्च कमी होतील, कामात अडचणी येऊ शकतात. शत्रूवर विजय मिळेल. प्रकृती ची काळजी घ्यावी. विद्यार्थ्याना थोडा प्रतिकूल काळ, जास्त अभ्यास करावा.
शुभ अंक- १,६
शुभ रंग- लाल, पांढरा

कर्क

राशीचक्रातील चौथी रास, विनयशील, बुद्धिमान, पाण्याशी संबंधित पोहोणे, जलशयास फेरफटका मारणे या गोष्टी आवडतात. मिष्टान्न भोजनाची आवड, जलक्रीडेत रुची, क्षमाशील, धर्मशील. या राशीचा अधिपती चन्द्र आहे, मध्यम उंच, साधारण गोल चेहेरा, डोके मोठे व गोल, भव्य कपाळ, केस विपुल व काळे, डोळे मोठे व चमकदार तेजस्वी, नाक लहान, मजबूत व सफेद दात, गौर वर्ण, आकर्षक व्यक्तिमत्व. अस्थिर व चंचल स्वभाव, भावनाप्रधान असतात.
या राशीस गुरू षष्ट व भाग्यस्थानाचा स्वामी असून पंचमात येतोय. भाग्य यावर्षी साथ देणार. शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना लाभाचा काळ. या जातकांना सहजरीत्या विविध लाभ प्राप्त होणार. प्रेमात यश, वैवाहिक सुख चांगले, विवाहेच्छुकांचे विवाह जुळणार. व्यक्तिमत्व सुधारणार, वजन वाढू शकते. वडिलांना आर्थिक फायदे होतील. आईचा कामाचा व्याप वाढेल. पुढील वर्ष सुखाचे ज्ञान व भाग्याच्या दृष्टीने छान परिणाम मिळतील. आतापर्यंत राहू मुळे जो त्रास झाला तो कमी होणार. काम करण्याचा उत्साह वाढणार. अडकलेली कामे मार्गी लागतील. घरात चैतन्यमय वातावरण राहील. अपूर्व आनंद मिळेल.
शुभ अंक – १,२,३ 
शुभ रंग – गुलाबी, पिवळा

सिंह

या लग्न राशीला जन्मणाऱ्या व्यक्ती तीक्ष्ण बुद्धीच्या, वात पित्त प्रकृतीच्या, मितभोजनी, अभिमानी असतात. ही रवीची राशी आहे. चेहेरा उग्र, स्थूल हनुवटी, मोठे तोंड, रुंद छाती, विस्तीर्ण कपाळ, चेहेऱ्यावर तेज, मिशा भरपूर, वैशिष्ट्यपूर्ण आवाज, व्यायामाची आवड, राजसारखी चाल असते. मनमोकळी व स्पष्टवक्ती असतात. स्वभाव खर्चीक असतो. पाठीची दुखणी संभवतात. या लग्न राशीवर छ. शिवाजीराजे, बाजीराव पेशवा यांचा जन्म झाला.
या राशीला गुरू पंचम व अष्टम स्थानचा स्वामी असून चतुर्थात आहे. नावलौकीक व प्रसिद्धीस काळ चांगला. गुप्त बातम्या बसल्याजागी समजतील, तुमची गुप्त गोष्ट गुप्तच राहील, नौकरीच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मार्च मध्ये विविध लाभ होतील. स्वतः च्या प्रकृतीकडे लक्ष्य द्यावे. आई वडिलांनाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. या जातकांनी आजारी पडू नये अशी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना काळ अनुकूल, टक्केवारी चांगली येईल.
शुभ अंक- ३,९
शुभ रंग- तांबडा, लाल

कन्या

या लग्नी जन्मलेली माणसे सद्गुणी, ज्ञानसंपन्न, व हुशार असतात. धनवान, चतुर असतात. कफ व पित्त मुळे आजारी पडतात. ही बुधाची रास आहे, द्विसभावाची रास असल्याने दोन प्रकारची स्वरूपे दृष्टीस पडतात, उंच, सडपातळ, हातापायाची बोटे लांब, डोके लहान, गोल व पाठीमागून उभट असते, ओठ रेखीव असून किंचित लाल असतात. कपाळ उंच , नाक लांब व सरळ. ही माणसे लाजरी, सुकुमार, हस्तकलाणीपूण, गोडबोली, काव्य-लेखनप्रिय, हसतमुख, व्यासंगी असतात. या लग्नावर चर्चिल, बाळासाहेब ठाकरे, एलिझाबेथ टेलर, यांचा जन्म झाला. कन्या लग्नास चतुर्थ व सप्तम स्थानाचा स्वामी गुरू असून तृतीयात येत आहे. विशेष पराक्रम करणार, आत्मविश्वास वाढणार, व्यापारास वृद्धीचे संकेत मिळतील. नौकरी बदलाची शक्यता, वैवाहिक सुखास चांगला काळ, भाग्यवृद्धी होईल. विविध लाभ सहज मिळतील, नावलौकिक होईल, प्रकृती ठीक राहील प्रवासाचे योग् येतील, खर्चाचे प्रमाण कमी होईल, लहान भावंडास शुभता प्राप्त होईल, विद्यार्थ्यांना जास्त मेहेनत घ्यावी लागेल.
शुभ अंक- ३
शुभ रंग – पांढरा

तूळ

या लग्नराशीवर जन्मलेल्या व्यक्ती सर्वांना प्रिय, व्यापारात कुशल, गुणी, प्रतिष्ठा पावणाऱ्या, सत्यवादी, सत्यवचनी व कुलश्रेष्ठ असतात. कफप्रकृती असते, उंच बांधा, सडपातळ, उंच नाक, चेहेरा लंबगोल, कपाळ चौकोनी, डोळे मोठे व काळे, दृष्टी तीव्र, दात शुभ्र, आवाज मोठा, सौंदर्यात उजवे, हसणे, चालणे , बोलणे आकर्षक असते. समतोल वृत्ती, न्यायी, विद्वान, शांत, संवेदनशील, कल्पक, प्रामाणिक, आनंदी असतात.
तूळ राशीला गुरु तृतीय व षष्ठ भावाचा स्वामी असून द्वितीयात येत आहे, हा गुरुबदल नौकरीच्या दृष्टीकोनातून फायद्याचा आहे, पण विवाहाचे योग नाहीत, लेखन कौशल्य वाढेल, कामाचा व्याप वाढेल, वडिलांची प्रकृती उत्तम राहील, लहान भावंडास अनुकूल काळ, आईचे तीर्थयात्रा पर्यटन होईल, दूर चे प्रवास होतील, बौद्धिक क्षमता वाढेल. बोलण्याचे कौशल्य सुधारेल. कर्ज घेऊन वाहन घर घेण्याचे योग आहेत. कर्ज फेडीसाठी बराच पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांना जानेवारी पर्यंत काळ उत्तम.
शुभ अंक – २,८
शुभ रंग पांढरा , निळा

वृश्चिक

या लग्नावर व्यक्ती कलहप्रिय, सदाचारी, विवेकी, व विद्वान असतात, मंगळाची रास असल्यामुळे उंच, मजबूत व सडपातळ बांधेसूद असतात. शत्रूंचा निःपात सहजपणे करतात. काही व्यक्ती कमी उंचीच्या व स्थूलपणाकडे झुकलेल्या असतात. चेहरा रुंद व लांब, कपाळ रुंद, हनुवटी मजबूत, केस पिंगट काळे कुरळे, डोळे पिंगट करड्या रंगाचे मोठे व चमकदार, भुवया सुंदर, पापण्या रुंद, स्वभावाने साहसी, संधीसाधू, गुप्त, गर्विष्ठ, क्रूर, दृढनिश्चयी, विध्वंसक, तिखट बोलणारे, अभिमानी, नाटकी, जहाल, गूढ गोष्टींची आवड असणारे, स्थिर असतात. त्यागात टोक गाठतात. कल्पनाशक्ती चांगली असते. या लग्नावर पं. भीमसेन जोशी, हेन्री फोर्ड, शरद पवार , स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म.
वृश्चिक राशीस गुरू धन व पंचम स्थानाचा स्वामी असून वृश्चिकेत प्रथम स्थानात जात आहे, तेव्हा पंचम सप्तम व नवम या स्थानांवर गुरुची दृष्टी पडते. मागील तेरा वर्षात सर्वात शुभ स्थिती वृश्चिकेला निर्माण झाली आहे. ज्ञान विज्ञानात आवड वाढेल, अर्थ व धर्मात रुची वाढेल, व विचार स्पष्ट होतील. आर्थिक नीती स्पष्ट असेल. वाणीत तेज येईल. वाहन व घर खरेदीचे योग बनत आहेत. निर्णय क्षमता वाढेल. संतान इच्छित जातकास संतानप्राप्तीचे योग आहेत. विवाहाचे योग जुळून येतील. विद्यार्थ्यांना अनुकुल काळ. या राशीस हा गुरू बदल शुभ. सर्व इच्छित कार्य सफल होईल.
शुभ अंक १,३
शुभ रंग – लाल , पिवळा

धनु

या व्यक्ती दैवब्राम्हण पुजक, वाहनसौख्या असणारे, मित्रयुक्त, सत्ववादी, निश्चयी असतात. शरीराने बळकट, उंच बांधेसूद माणसे जन्मतात. मान लांब, डोके उंच, कपाळ रुंद, खांदे उतरते, स्थूल शरीर, डोळे बदामाच्या आकाराचे, तेजस्वी, ओठ जाड स्वभाव निष्कपट, प्रामाणिक, उदार, आनंदी असतो.
या राशीस लग्न व चतुर्थाचा स्वामी गुरू असून व्ययस्थानात येत आहे. दूरचे प्रवास किंवा परदेशगमन आहेत. मेहेनत जास्त करवी लागेल. धार्मीक कार्यात धन खर्च होईल. परिवारात धार्मिक शुभ कार्य होतील, जमीन
खरेदी होईल, आजार कमी होतील, परिवार सुख कमी प्रमाणात मिळेल. नौकरीच्या ठिकाणी प्रसन्नता असेल. विद्यार्थ्यांनी जास्त मेहेनत करावी.
शुभ अंक -३,५
शुभ रंग- हिरवा, पांढरा.

मकर

या राशीस वात प्रकृतीचे उंच शरीर, सडपातळ, डोके उभट, अति मोठे वा अति लहान, तोंड रुंद, हसताना दात दिसतात. केस किंचित कुरळे, डोळे काळे, दात मोठे असतात. ही शनी ची रास आहे. त्यामुळे शनीच्या चांगल्या वाईट सवयी यात दिसतात. स्वभाव व्यवहारी, हिशोबी, राजकारणी, भित्रा, सावध, असंतुष्ट, चिकटीचा, चिडखोर असतो. शनी पत्रिकेत चांगला असल्यास शिस्तप्रिय, चिकाटी, दृढनिश्चयी, बलिदानाची वृत्ती आढळते. या लग्नास महाराणा प्रताप, सुनील गावस्कर यांचा जन्म झाला.
मकर राशीस तृतीय व व्यय स्थानाचा स्वामी गुरू लाभत प्रवेश करत आहे. या राशीस यावर्षी सर्व विशेष लाभ होणार आहेत. खर्च वाढतील. पण नुकसान होणार नाही. फायदाच होईल. प्रकृती उत्तम राहील, धना संबंधी च्या चिंता दूर होतील, अमाप धन मिळेल. नौकरी करणाऱ्यांचे प्रमोशन होतील. व्यापारी वर्गास पैसे गुंतवावा लागेल. वैवाहिक सुख मिळेल. परिवारात धार्मिक कार्यक्रम होतील. जेष्ठ बंधुवर्गास लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना काळ प्रतिकूल, अभयासात अडचणी निर्माण होऊ शकतात. विवाहेच्छुकांचे विवाहयोग आहेत.
शुभ अंक – ९
शुभ रंग- लाल

 

कुंभ

या लग्नावर जन्मलेला मनुष्य स्थिर बुद्धीचा, सुंदर चेहेरा, मधुर भाषण करणारा, पुत्र व मित्रांमध्ये प्रिय, तल्लख बुद्धी, चंचल, शत्रूंचा द्रोह करणारा. या बुद्धिराशीचा स्वामी शनी आहे. उंच शरीर, मजबूत, चेहेरा या अंडाकृती वा गोल, वर्ण सावळा, मान लांब, केश विपुल, डोळे पाणीदार व काळे, चेहेरा देखणा असतो. या राशींचा मनुष्य विद्याव्यसंगी, बुद्धिमान, कल्पक, तत्वद्न्य, कठोर, अभ्यासु, मानवतावादी, आनंदी असतो. विवाह वैचित्र्य आढळते.
कुंभ राशीस गुरू धन व लाभ स्थानाचा स्वामी असून दशमात प्रवेश करत आहे. लाभ व बचत वाढणार. मान सन्मान मिळणार, नौकरी करत असल्यास प्रमोशन. दिर्घकालचा आजार होऊ शकतो. प्रकृती बाबत काळजी घ्यावी. पैतृक संपत्ती चा लाभ मिळणार. विवाद झाल्यास यश मिळेल. पैसे गुंतवणुकीतून लाभ मिळेल, वडिलांची प्रकृती उत्तम असुन मान प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक सुख समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना लाभ होतील. विवाहेच्छुकांचे विवाह होइल.
शुभ अंक – १,३
शुभ रंग – पिवळा, हिरवा

मीन

या जन्मलग्न राशीस जन्मलेल्या व्यक्ती स्थूल देहयष्टीच्या, किर्तीमान, चतुर, व तीक्ष्ण दृष्टीची असतात. शरीर मांसल व स्थूल, खांदे मजबूत, मान व हातापायाची बोटे जाड असतात. चेहेरा लंबगोल, केस पिंगट व मऊ असतात. डोळे पिंगट निळे, मोठे असतात. या राशीची व्यक्ती शांत, दयाळू, चंचल, कल्पनेत रमणारी, उदार, भावनाप्रधान, दानशूर असते. या लग्नावर जन्मलेली व्यक्ती रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे.
या राशीस गुरू प्रथम व दशमाचा स्वामी असून भाग्यात प्रवेश करत आहे. आतापर्यंत मीन ला काळ अवघड होता. आता भाग्योदय होणार आहे. अवघड दिवस दूर जाणार आहेत. शुभ दिवस सुरू होत आहेत, अडकलेली कामे पूर्ण होतील, संतान सुख मिळेल, नौकरीच्या जागी समाधानकारक स्थिती राहील. व्यापारीवर्गास काम वाढेल, दूरचे प्रवास करावे लागतील. नवीन गुंतवणूक होईल. त्यातून लाभ मिळेल. राजनैतिक लोकांना पद प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
शुभ अंक – ३,९
शुभ रंग – हिरवा , काळा

उपाय
जन्मकुंडलीत गुरुची शुभाता वाढवण्यासाठी उपाय-
उपायांमध्ये दान, मंत्र, रत्न, कर्म हे मुख्य चार प्रकार आहेत.
गुरुची शुभता वाढविण्यासाठी आपल्याकडील ज्ञान इतरांना निस्वार्थी भावनेने द्यावे. शुभ कर्म करावेत, वृक्षारोपण करावे, वृक्ष लावता येत नसल्यास वृक्षांना पाणी घालावे, तेथील कचरा साफ करावा.
दान शुभकर्म आहे, दान हे उपाय म्हणून करू नये, निस्वार्थीपणे दान करावे, पिवळ्या वस्तूंचे दान करावे, पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना द्यावेत, शिक्षणास मदत करावी, पिवळे वस्त्र दान करावे, केळी दान करावी.
रत्न योग्य विद्वानांचा सल्ला घेऊनच धारण करावे, गुरू साठी पुष्कराज धारण करावे.