नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले- एका तरुणीसह मुलगा ही जखमी

0
1305
Google search engine
Google search engine

अमरावती : नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.

सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता राजलक्ष्मी टॉकीजशेजारी असलेल्या महावितरण तक्रार निवारण केंद्रासमोर फुगेविक्रेत्याकडील छोटेखानी सिलिंडरचा स्फोट झाला. पायी जात असलेली धारणी येथील प्रिया मालवीय (२०, ह.मु. गाडगेनगर) व गौरव विनोद भैसे (१४, रा.कॅम्प, बियाणी चौक) यांच्या अंगावर सिलिंडरचा तो तुकडा कोसळला. या लोखंडी तुकड्यामुळे प्रिया व गौरव हे जखमी झाले. प्रिया हिच्या डोक्याला, तर गौरवच्या हाताला जखमा झाल्या. उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.
रात्रीचा सुमारास कोतवाली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशातील खानसिंह सौदामसिंह कुसबा ठाकूर (२७ वर्ष, रा. यशोदानगर) याला अटक केली. पोलिसांनी जखमींच्या बयाणावरून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३३७, ३३८, २८५ अन्वये गुन्हा नोंदविला तसेच फुटलेले सिलिंडर जप्त केले.