सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा !

0
927
Google search engine
Google search engine

 नगरचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एच्. पालवे यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे शिष्टमंडळ

धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भूमिका स्वागतार्ह !

नगर – केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याविषयीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशभरात या निर्णयाविरोधात पडसाद उमटू लागले आहेत. केरळसह भारतभरात भगवान अय्यप्पांचे कोट्यवधी भक्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना, सर्वसामान्य नागरिक आणि बहुतांश राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात मोर्चे, आंदोलने आदींद्वारे निषेध करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी विजयादशमीच्या दिवशी मार्गदर्शन करतांना शबरीमला मंदिराची परंपरा जपली पाहिजे ! असे म्हणत हिंदु परंपरांचे रक्षण करण्याच्या मोहिमेला बळ दिले आहे. सरसंघचालकांची ही भूमिका अतिशय स्वागतार्ह असून हिंदु जनजागृती समितीचीही हीच भूमिका आधीपासून राहिलेली आहे. सरसंघचालकांच्या या भूमिकेचा आदर करत महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील मंदिरांमधील परंपरांचेही रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील शनि चौथरा, नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर यांसह सहस्रो मंदिरांत ज्या परंपरांवर घाला घालण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत झाला आहे, तो हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारने हिंदु परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी बी. एच्. पालवे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदु परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.