निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारा ! – समस्त साधू-संतांचा भाजपला ‘धर्मादेश’

59

 

नवी देहली केंद्रातील भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी अयोध्येत राममंदिर निर्माण करावे, असा ‘धर्मादेश’ समस्त साधू-संतांनी भाजप सरकारला दिला. अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील ३ सहस्रांहून अधिक साधू-संतांचे ‘धर्मादेश’ संमेलन देहलीतील तालकटोरा मैदानात ३ आणि ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. दुसर्‍या दिवशीच्या सत्रात धर्मांतराच्या विषयावरही व्यापक चर्चा झाली. राममंदिरावर आता कुठलीही तडजोड होणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून राममंदिर उभारावे, असाही धर्मादेश सरकारला देण्यात आला. याशिवाय ‘राममंदिरासाठी हिंदूंनी संघटित व्हावे’, असेही आवाहन संतांनी केले.

‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रनंद सरस्वती म्हणाले, ‘‘राममंदिर उभारावे, ही आमची मागणी किंवा आग्रह नव्हे, तर आदेश आहे. सरकारने असे काही केले नाही, तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. इतिहासात यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. आता मंदिर होणार म्हणजे होणारच आहे.’’

स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, ‘‘जर एका आतंकवाद्यासाठी रात्री सर्वोच्च न्यायालय उघडू शकते, तर हिंदूंच्या धार्मिक विषयावर निर्णय देण्यास टाळाटाळ का केली जात आहे ? आम्ही न्यायालयाचा मान राखतो; पण राममंदिर उभारणे, हा आमचा अधिकार आहे. सरकारने वर्ष २०१९ मधील निवडणुकीपूर्वी जर राममंदिर उभारले नाही, तर देव त्याला शिक्षा करील. आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून लोकांचा संयमही सुटत चालला आहे.’’

रोहिंग्या मुसलमानांना हाकला !

या धर्मादेशात साधू-संतांनी सांगितले की, घुसखोरांना रोखण्यासाठी बांगलादेशजवळील सीमेवर कुंपण घातले जावे. देशात घुसलेल्या रोहिंग्या मुस्लमानांना देशातून हाकलून द्यावे, असा प्रस्तावही सर्वानुमते संमत करण्यात आला.