Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळील घटना

शासकीय वाहन ४० फुटापर्यंत गेले घासत

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे येथील प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा धामणगावचे तहसिलदार हे शासकीय गाडीने रेती माफीयाचा पाठलाग करीत असतांना रेती माफीयाने ट्रक थेट शासकीय गाडीवरच चढविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १९) दुपारी १२.१५ वाजता चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. यामध्ये एसडीओंसह दोघे जखमी झाले आहे. या घटनेत शासकीय वाहन अंदाजे ४० फुटापर्यंत घासत गेले.

चांदूर रेल्वे तालुक्यातुन अवैध रेती वाहतुक अनेक दिवसांपासुन जोमात सुरू आहे. परंतु स्थानिक पोलीस व महसुल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अशातच नव्यानेच चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार सांभाळणारे धामणगाव रेल्वेचे तहसिलदार अभिजीत नाईक (४०) हे शासकीय वाहन टाटा सुमो क्र. एमएच २७ एए ५०३ याने धामणगाव वरून चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयात सोमवारी येत होते. यावेळी गाडीमध्ये शिपाई प्रकाश बठे व गाडी चालक महेंद्र नागोशे होते. तिवरामार्गे चांदूर रेल्वे येत असतांना चांदूर रेल्वे – वर्धा या राज्य महामार्गवरून त्यांना भरधाव रेतीचा ट्रक दिसला असता त्यांनी या ट्रक क्र. एमएच२७ बीएक्स ०२९० या पाठलाग केला. अशातच सातेफळ फाट्याजवळ ओव्हरटेक केल्यानंतर ट्रकाच्या पुढे जात असतांना रेती माफीयाने ट्रक सरळ उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरच चढविला. यात अभिजित नाईक यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली, तर चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठीला मुका मार लागला आहे. कर्मचारी बठे यांना डोक्याला मार लागलाय. देव बलत्तर म्हणुन गाडीतील तीघेही सुखरूव वाचले असुन केवळ जखमा झाल्या आहे. या अपघातात शासकीय वाहनाचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे. घटनास्थळावरून आरोपी ट्रकचालकाने पळ काढला असुन सद्यास तो फरारीत आहे. यानंतर एका वाहनाने जखमी अभिजीत नाईक, प्रकाश बठे व महेंद्र नागोशे यांना तत्काळ चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात आणुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी रूग्णालयात पोहचले होते. रेती चालकाने मुद्दामपणे शासकीय वाहनाला उडवून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार प्रभारी एसडीओ अभिजित नाईक यांच्यावतीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. तळेगाव पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असुन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी घटने विषयी माहिती जाणून घेतली. तळेगाव दशासर व चादूर रेल्वेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळ गाठले होते. या घटनेमुळे महसुल विभागात एकच खळबळ उडाली असुन आता तरी अवैध रेती वाहतुक पुर्णत: बंद होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चांदूर रेल्वे पोलीस व महसुल प्रशासन झोपेतच

सद्या रेतीघाट बंद असल्सामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन अवैध रेतीची चोरटी वाहतुक सुरू आहे. परंतु याकडे चांदूर रेल्वे येथील पोलीस व महसुल प्रशासनाने कानाझोळा केल्याची चर्चा सुरू आहे. प्रभारी एसडीओंना ट्रक दिसल्यानंतरच त्यांनी पाठलाग केला असुन आतापर्यंत प्रशासन झोपेत का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रभारी एसडीओंचा प्रतिक्रीया देण्यास नकार

सदर प्रकरणाबाबत एसडीओ नाईक यांची रूग्णालयात प्रतिक्रीया जाणुन घेण्याचा चांदूर रेल्वे येथील मिडीया प्रतिनीधींनी प्रयत्न केला असता त्यांनी सुरूवातीला १० मिनीटांत प्रतिक्रीया देण्याचे सांगितले. परंतु काही वेळानंतर त्यांनी बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगुन प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. यावरून शहरात अनेक तर्क वितर्क लावले जात होते.

हाथ दाखविला असता गाडी चढविली – शिपाई बठे

एसडीओ साहेबांनी रेतीचा ट्रक थांबविण्याचे सांगितले. त्यामुळे रेतीच्या ट्रकाला थांबविण्यासाठी मी हाथ दाखविला असता ट्रक चालकाने ट्रक सरळ आमच्याच गाडीवर आणल्याचे शिपाई प्रकाश बठे यांनी सांगितले.

साईड मागितल्यानंतर काय झाले समजलंच नाही – चालक नागोशे

साहेबांना घेऊन चांदूर रेल्वे एसडीओ ऑफीस ला येत असतांना ट्रकाला शिपायाने हाथ दाखवुन साईड मागितली. आणि त्यानंतर काय झाले समजलच नसल्याचे शासकीय गाडीचा चालक महेंद्र नागोशे यांनी म्हटले.