ऑडीटसाठी विशेष पथक शनिवारी न.प. कार्यालयात फिरकलेच नाही – एसडीओ अभिजीत नाईक यांच्या अनुपस्थितीमुळे सील उघडलेच नाही

0
691
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
स्थानिक नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ऑडीटसाठी नेमण्यात आलेले विशेष पथक शनिवारी न. प. कार्यालयात फिरकलेच नाही. उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक हे वरिष्ठ कार्यालयात बैठकीला गेल्यामुळे सदर सील शनिवारी पुन्हा उघडले नाही.
     चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे सन २०१४ ते अद्यावत २०१८ पर्यंतचे संपूर्ण रेकॉर्ड गुरुवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने स्थानिक उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांच्या नेतृत्वात जप्त करून सील करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अभिजीत नाईक यांच्या नेतृत्वात चार अधिकाऱ्यांचे पथक चांदूर रेल्वे नगरपरिषद मध्ये दाखल होऊन त्यांनी काही रेकॉर्डचे ऑडिट केले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा सील लावुन परत गेले. परंतु शनिवार ला सदर तपासणीकरिता विशेष पथक चांदूर रेल्वे नगरपरिषद मध्ये फिरकलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे आता सोमवारी ऑडीटच्या प्रक्रीयेला पुन्हा सुरूवात होणार असल्याचे समजते.

ती तक्रार आ. जगताप यांचीच

विशेष ऑडीट बसविण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार कोणी केली याबद्दल अनेक चर्चा सुरू असतांना अखेर शनिवारी याचा खुलासा झाला. खुद्द आमदार विरेंद्र जगताप यांनीच सदर तक्रार केली असुन २०१४ ते २०१८ अंतर्गत नगर परिषदमधील मंजुर कामांचे तांत्रिक मान्यताप्राप्त अंदाजपत्रकातील विना स्वाक्षरीचे पान काढून फेरबदल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही तक्रार विभागीय आयुक्तांकडे आ. जगताप यांनी केली आहे.
ठेकेदारांच्या हितासाठी स्वराज्य संस्था नाही – आ. जगताप
 तांत्रिक मान्यताप्राप्त अंदाजपत्रकातील फाईलमध्ये शंका आल्याने मी विभागीय आयुक्तांना लेखी पत्र देऊन विशेष ऑडिटची मागणी केली व त्यानुसार सदरची कारवाई सुरू झाली आहे. नगरपरिषदेत गोर-गरीबांचा पैसा असून विकासाचे धोरण ठेवून गावातील नागरिकांना मूलभूत सोयी पुरवून गावाचा विकास करण्याचा नगरपरिषदेचा नेहमी उद्देश असतो. फक्त ठेकेदारांचे हित पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था नाही असे मत आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.
पाचही वर्ष काँग्रेसचीच सत्ता
आ. जगताप यांनी ज्या वर्षांचे विशेष ऑडीट बसविण्याची मागणी केली ते पाचही वर्ष स्थानिक न.प. मध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. त्यामुळे स्वत:च्याच पक्षाच्या कार्यकाळातील फाईलींचे विशेष ऑडीट  करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केल्यामुळे शहरात अनेक तर्क – वितर्क लावल्या जात आहे.