‘सनातन’ला गोवण्यासाठी किती कथानके रचणार ? – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

0
926
Google search engine
Google search engine

 

मुंबई – डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात आता अन्वेषण यंत्रणा अनेक कथानके मांडत आहेत. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १८ कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केल्याविषयी अत्यंत हास्यास्पद प्रसिद्धीपत्रक कर्नाटकच्या ‘विशेष अन्वेषण पथका’ने (एस्.आय.टी.ने) प्रसिद्धीस दिले, तर ‘सी.बी.आय.’ने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट करण्याच्या आधीच आरोप करायला आरंभ केला आहे. अर्थात् कर्नाटकात काय होत आहे, त्याविषयी आम्ही कर्नाटकात जाऊन बोलूच; परंतु गेल्या १० वर्षांचा आढावा घेतला, तर काँग्रेस आणि ‘सेक्युलरवाद्यां’चे ‘मालेगाव – भाग १’ फसले, तर आता ‘मालेगाव – भाग २’ चालू करण्याचे षड्यंत्र दिसत आहे. यात अटक झालेले कार्यकर्ते विविध संघटनांचे असले, तरी सातत्याने प्रसारमाध्यमांपुढे नाव मात्र सनातन संस्थेचे घेऊन तिला लक्ष्य करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत, अशी परखड भूमिका सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मांडली. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये १ डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हेही उपस्थित होते.

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की,

१. ‘सनातन संस्था ही लोकांना संमोहित करून भुलवते’, असा मोठा प्रचार करण्यात आला; परंतु संमोहनतज्ञांनी यातील फोलपणा जाहीरपणे उघड केल्यावर ती मोहीम थंडावली.

२. ‘मडगाव स्फोटामध्ये सनातनचा हात होता’, असे म्हणणारे हे कधीच सांगत नाहीत की, त्या प्रकरणी आश्रमाची झडती घेण्यात आली. संस्थेची ट्रकभर आर्थिक कागदपत्रे पडताळण्यात आली आणि हे होऊनही न्यायालयाने ‘सनातनला गुंतवण्यासाठी पोलिसांनी हे खोटे कुभांड रचले’, असे सांगत सर्वांना निर्दोष सोडले. याविषयी आज कोणीही बोलत नाही.

३. अन्वेषण यंत्रणांनी दबावातूनच ‘वर्ष २०१५ मध्ये समीर गायकवाड यांनी कॉ. पानसरे यांच्यावर गोळी झाडली’, असे म्हणून त्यांना अटक केली. तेव्हाही आम्ही आपल्यासमोर येऊन सांगितले की, तो आमचा साधक आहे आणि तो निर्दोष आहे. समीर गायकवाडला न्यायालयाने जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाने तो रहित केलेला नाही आणि पोलीस त्याच्या विरोधात खटला चालवत नाहीत.

४. सी.बी.आय. आधी म्हणाली, ‘‘सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्या.’’ आता म्हणत आहे, ‘‘सचिन अंधुरे आणि शरद कळस्कर यांनी गोळ्या झाडल्या. आता मारेकरी पालटत आहेत. गोळ्यांच्या जागाही पालटत आहे.’’ हत्यांचा कालावधी पालटत आहे. वर्ष २०१५ मध्ये आम्ही ‘सी.बी.आय.चे अधिकारी खोटे कारस्थान कसे रचत आहेत’, याचे पुरावे समोर ठेवले होते. तेच आता मागच्या पानावरून पुढे चालू आहे.

५. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाचा इतिहास कलंकित असतांना मुख्यमंत्र्यांनी त्याचे केलेले समर्थन ही गंभीर गोष्ट आहे. आतंकवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या रचून हिंदुत्वनिष्ठांचा छळ केला आहे. त्याचे आम्ही बळी आहोत. संस्थेवरील आरोपांना काळ उत्तर देईल. धर्मग्रंथांत सांगितले आहे, ‘कालाय तस्मै नम:।’ काळावर आमचा विश्‍वास आहे. आज जे सनातन संस्थेवर आरोप आहेत, त्याचे उत्तर काळच देईल. न्यायालयीन प्रक्रियेत आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करू.

६. मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत ‘जे योग्य असतील, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू’, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य अभिनंदनीय आहे.