मेगाभरतीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा अनुकंपा निकषानुसार भराव्या – भाऊसाहेब पठाण

0
999

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध 72 हजार पदांच्या भरतीमध्ये 11673 जागा या अनुकंपा तत्वावरील राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गासाठी भरण्यात याव्यात आणि गेली अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कामगार संघटेनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषित केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती. आता ही भरती सुरू होत असल्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाची पदे रिकामी आहेत. मात्र नियमानुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला प्राधान्य दिले गेले पाहिजे, अशी त्यांची इच्छा असल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संघटनेच्या अन्य मागण्यांदेखील पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या मागण्या अशा – वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत समाविष्ट करावे, चतुर्थश्रेणी कामगार निवृत्त झाल्यानंतर त्याच्या एका पाल्यास शासकीय सेवेत नोकरी मिळावी, सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, या कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहत गृह खात्याप्रमाणे बांधून द्यावी, चतुर्थश्रेणीतून तृतीय श्रेणीत 25 ऐवजी 50 टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नये, 6 जून 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक – अ व एक – ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त) नियम व आदेश रद्द करण्यात यावे, सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा, सन 2005 पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुन्या पद्धतीने लागू करावी, कृषी विभागात आकृतीबंध पदे निर्माण करताना 1998 प्रमाणे वाहन चालक व चतुर्थश्रेणी पदे निर्माण करावीत, महसूल विभागातील हवालदार, नाईक, दप्तरी, पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे लागू करण्यात यावे व शैक्षणिक अर्हतेनुसार तलाठी या पदावर पदोन्नती मिळावी.