धानुरी करजगाव रस्त्याचे कामाचा अहवाल थंड बस्त्यात

0
653

धानुरी करजगाव रस्त्याचे कामाचा अहवाल थंड बस्त्यात ;
पाच महिन्यांपासून फाईल बंद
राजकीय हस्तक्षेपामुळे टाळाटाळ

लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव या रस्त्याचे कामात अनियमितता व गैरप्रकार झाल्याचा अहवाल त्रिसदस्यीय चौकशी समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आदर केला आहे. अहवाल सादर होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असुन अहवाल बस्त्यात बांधुन ठेवण्यात आला आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सन २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत धानुरी करजगाव रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करून ही रस्त्याचे कामच झाले नसल्याची तक्रार करुन धानुरी ग्रामस्थांनी जिपसमोर अमरण उपोषण केले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शिंगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. सदरील समितीने २९ मे रोजी प्रत्यक्ष रस्त्याला भेट देऊन पाहणी केली व
२१ जुन २०१८ रोजी आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. सदर अहवालात सन २०१३-१४ ते २०१६-१७ या आर्थिक वर्षात धानुरी ते करजगाव हा ग्रामीण मार्ग क्र. ३१ असुन या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, खड्डे भरणे व पुल उभारणीचे कामासाठी ४७ लाख ७८ हजार १२५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु सदर रस्ता अद्यापही पाणंदीचाच आहे. तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात आल्या. त्यात लाखो रुपयांचा निधी ज्या ग्रामीण रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला होता तो निधी त्या रस्त्यावर खर्च न करता दुसऱ्या पाऊलवाटेवर खर्च करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट करण्यात आले होते. सदरचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करुन तब्बल पाच महिन्याचा कालावधी लोटला परंतु याप्रकरणी राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा अहवाल आला असताना राजकीय हस्तक्षेप व लालफितीच्या कारभारामुळे अहवाल बस्त्यात बांधुन ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन संगणमताने रक्कम हाडप करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारुन *कानुनके के हाथ लंबे होते है* हे दाखवून द्यावे अशी मागणी होत आहे.

(सहनशक्तीचा अंत नका अन्यथा शेतकरी हातात रुमणे घेतील. – विठ्ठल बुरटुकणे
धानुरी करंजगाव या रस्त्याचे कामासाठी आलेला निधी हाडप करण्यात आला आहे. आम्ही उपोषण करुन सामुहिक आत्मदहनाचा इशारा देऊन वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर अहवाल देण्यात आला आहे. सर्वच:च्या स्वार्थासाठी आमचे हक्काचा निधी सांडपाणी करुन आम्हा शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. दोषींवर कारवाई करुन रस्ता मजबुतीसाठी निधी मंजूर करावा. अधिका-यांनी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अन्यथा शेतकरी हातात रुमणे घेतील. – विठ्ठल बुरटुकणे शेतकरी)