नगरच्या विकासासाठी सुद्धा आम्ही वचनबद्ध – मुख्यमंत्री

0
827
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – धुळे महानगरपालिकेत 3 जागांवरून 50 जागांपर्यंत भक्कम यश संपादन करीत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून भाजपा देईल, असे म्हटले आहे.

2 महापालिका मिळून 142 जागांपैकी सर्वाधिक 64 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. राज्यात 6 नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाने उल्लेखनीय यश संपादन केले असून, एकूण 109 पैकी सर्वाधिक 37 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. या 6 नगरपालिकांपैकी 3 नगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता आली असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा, नागपूर जिल्ह्यातील मौदा आणि जळगावमधील शेंदुर्णीचा समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस आणि स्थानिक आघाडीला प्रत्येकी एका नगरपालिकेत सत्ता प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही ठिकाणी सत्ता प्राप्त करता आली नाही. अहमदनगर महापालिकेत भाजपा 9 जागांवरून 14 जागांवर गेला आहे. जागा वाढल्या असल्या तरी अपेक्षित यश भाजपाला मिळू शकलेले नाही. स्थानिक पातळीवर भाजपा कुठे कमी पडली, याचे चिंतन निश्चितपणे करण्यात येईल. पण, पूर्वीच्या तुलनेत भाजपाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आपण मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धुळे आणि अहमदनगर अशा दोन्ही जनादेशांचा आम्ही स्वीकार करतो. या दोन्ही शहरांच्या सुनियोजित विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, राज्यातील मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल तसेच या यशासाठी प्रचंड परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.