नरखेड येथे पाणी फाउंडेशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न – पानी फाउंडेशन दुष्काळविरोधात लढणारी लोकचळवळ !

0
1135
Google search engine
Google search engine

सर्वांनी पाण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज — दयाराम राठोड गट विकास अधिकारी !

नरखेड / –

पानी फाउंडेशन ही दुष्काळावर मात करण्यासाठी तयार झालेली संस्था पुढे आली असून ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी पानी फाउंडेशन च्या माध्यमातून गावातील नागरिकच समोर येऊन प्रयत्न करतांना दिसत आहे . म्हणूनच या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे, हे पानी फाउंडेशनचे उल्लेखनीय कार्य नरखेड तालुक्यात होतांना दिसत आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयांबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९०% दुष्काळी भागात पानी फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका सलग दुसऱ्या वर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात आला असून या स्पर्धेची सुरुवात नरखेड तालुक्यात सुरू झाली आहे . २०१९ या वर्षातली वॉटर कप स्पर्धा नियोजन व मार्गदर्शन कार्यशाळा नरखेड येथील पंचायत समिती सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार , पानी फाउंडेशन चे मुख्य मार्गदर्शक नामदेव नन्नावरे , जिल्हा कार्यकारी अधिकारी किरण भोयर , सभापती राजू हरणे , तहसीलदार शेखर पुनसे , गट विकास अधिकारी दयाराम राठोड , सहाय्यक गट विकास अधिकारी चेतन हिवंज , नायब तहसीलदार डोनगावकर , उप सभापती माया दुरुगकर ,पं स सदस्य संध्या मातकर , पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी , उपस्थित होते .

नरखेड तालुक्यात पाणी फाउंडेशन च्या प्रयत्नातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , रोजगार सेवक , कृषी विभाग , सिंचन विभाग, वन विभाग ,आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी गट विकास अधिकारी दयाराम राठोड म्हणाले की, जलसंधारण क्षेत्रात पाणी फाउंडेशनचे काम उल्लेखनीय आहे. लोकसहभागातून अनेक गावे पाणीदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक ग्रामपंचायतीस व प्रत्येक गावास कशाप्रकारे उतरता येईल व कोणत्या प्रकारची कामे करता येतील, याचे नियोजन कार्यशाळेत करण्यात आले होते तालुक्यामधील सर्वच गावांनी आपले गाव पाणीदार करण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज भरून देण्याचे आवाहन गट विकास अधिकारी दयाराम राठोड यांनी सरपंच व गावकरी मंडळी यांना केले .

सभापती राजू हरणे यांनी राजकारणातील आडवाआडवी व जिरवाजिरवी थांबवून पाणी आडवा व पाणी जिरवा ही लोक चळवळ निर्माण करून पाण्यासाठी सर्वांनी राजकारण विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी पानी फाउंडेशन चे मुख्य मार्गदर्शक नामदेव नन्नावरे यांनी भविष्य राखायचे असेल तर दुष्काळमुक्त महाराष्ट्र व प्रत्येक गाव पाणीदार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे सांगितले आपला किमती वेळ चांगल्या कामासाठी दिल्यास मोठा बदल नक्कीच घडू शकतो , पर्यावरण वाचविणे , माती आणि पाणी या विषयावर विशेष भर देऊन आगपेटीमुक्त शिवार , नाडेप , माती परीक्षण , जलबचत , श्रमदान , वॉटर बजेट , पाण्याचा प्रश्न सोडविणे , नियोजन , शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले त्यावेळी तालुक्यातील सरपंच व सचिव यांनी आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र येऊन काम करू अशी शपथ यावेळी त्यांनी घेतली .