प्रस्तावित कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचार्‍यांचा विरोध तीन दिवसीय संपात सहभाग नाहीच : बापू जगदे

0
810

प्रस्तावित कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचार्‍यांचा विरोध

तीन दिवसीय संपात सहभाग नाहीच : बापू जगदे

उस्मानाबाद, दि. 6 महावितरण कंपनीत बेकायदेशीररित्या प्रस्तावित असलेल्या कर्मचारी पुनर्रचनेला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही प्रक्रिया रद्द करावी, मागासवर्गीयांचा अनुशेष नष्ट न करता कामाच्या वाढत्या आवश्यकतेनुसार रिक्त पदे आरक्षणानुसार भरण्यात यावीत, अशी मागणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंदसिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. काही संघटनांनी बैठकीनंतर सुध्दा सोमवार, 7 जानेवारीपासून तीन दिवस संप पुकारला आहे. या संपात मागासवर्गीय कर्मचारी सहभागी होणार नसून या कालावधीत ग्राहकांना चांगली वीजसेवा देण्यात येईल, अशी माहिती मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सचिव बापू जगदे यांनी दिली आहे.
शनिवारी महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसमवेत झालेल्या बैठकीत संघटनेने विविध मागण्यांसाठी पदभरतीला विरोध दर्शविला आहे. या बैठकीत महावितरण कंपनीतील प्रस्तावित कर्मचारी पुनर्रचना रद्द करावी, तिन्ही वीज कंपन्यांमध्ये रिक्त असलेली 30 टक्के मंजूर पदे मागासवर्गीयांच्या अनुशेषांसह कामाचे निकष व वाढती जबाबदारी लक्षात घेवून तत्काळ भरावीत, महावितरण कंपनीतील तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचार्‍यांचे कामाचे तास निश्चित करून अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, गटविमा योजनेचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार वीज कर्मचार्‍यांवर न लादता या योजनेंतर्गत पाच लाख रूपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकिय सेवेचे फायदे वीज कंपन्यांनी स्वत:च्या महसुलातून द्यावे, महानिर्मिती कंपनीमध्ये चालू स्थितीत असलेले कोणतेही संच बंद करण्यात येवू नये. तसेच लघुजलविद्युत केंद्र खासगी भांडवलदारांकडे सोपविण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रकरणे निकालात काढण्यात यावी, आदी मागण्य करण्यत आल्या. या बैठकीस संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके, केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र जारोंडे, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रेमानंद मौर्य, केंद्र उपसरचिटणीस संजय मोरे, केंद्रीय उपाध्यक्ष मधुकर कांबळे, उपसरचिटणीस संजय मोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान सोमवार, 7 ते 9 जानेवारी रोजी काही संघटनांनी संप पुकारुन संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्यामुळे खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. सहा संघटनांनी एक दिवसाच्या तर त्यातील तीन संघटनांनी तीन दिवसाच्या संपाची नोटीस दिली आहे. या संघटनांमध्येच एकवाक्यता नसल्यामुळे अशाा संघटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही संघटनांच्या संपाला देशात कुठेही प्रतिसाद नाही. या को-ऑर्डिनेशन कमिटीचे नेतृत्व देशभरात आरक्षणविरोधी आंदोलन पेटवणारे सर्वजनहिताय संरक्षण समितीचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे हे करीत आहेत. दुबे यांचा मुळ अजेंडा संविधांनिक आरक्षणाला विरोध करणे हाच असताना त्यांच्या नेतृत्वात संप पुकारणार्‍या कामगार संघटनांनी संविधानिक आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केली असून आजपासून पुकारलेल्या संपात कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष एन. डी. पोटभरे, जयंत कांबळे, आर. एस. गायकवाड, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष बालाजी आगवाने, सचिव बापू जगदे, सिद्दीक मुलानी, विठ्ठल गायके, दत्ता पौळ, गौतम मोटे, सचिन, शिंदे, सचिन मगर, निशिकांत संगवे, संजय भांडे, गणेश जमादार, सुदाम ओव्हाळ आदींनी केले आहे.