वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल: नागपुरी संत्र्याने जिंकली पाहुण्यांची मने ! संत्रा शेतीला प्रत्यक्ष भेट : विविध प्रकारची माहिती जाणून घेतली !

0
1811

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल: नागपुरी संत्र्याने जिंकली पाहुण्यांची मने !
संत्रा शेतीला प्रत्यक्ष भेट : विविध प्रकारची माहिती जाणून घेतली !

विशेष प्रतिनिधी /
नागपूर येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधींनी शनिवारी प्रगत शेतकरी अखिल जुनघरे यांच्या काटोल रोडवरील भव्य संत्रा शेतीला प्रत्यक्ष भेट दिली व नागपुरी संत्र्याची पीक पद्धती, वैशिष्ट्ये यासह विविध प्रकारची माहिती जाणून घेतली. त्यांनी नागपुरी संत्र्याची चवही चाखली. नागपुरी संत्र्याने आपल्या एकंदरीत विशेषतेने त्यांची मने जिंकली.
तज्ज्ञ पाहुण्यांमध्ये ब्राझीलचे डॉ. टोझॅट्टी, व्हिएतनामचे डॉ. होआ, नेपाळचे डॉ. उमेश आचार्य, डॉ. शांता कारकी, दक्षिण कोरियाचे डॉ. के. साँग व अमेरिकेचे डॉ. एस. गोवडा यांचा तर, इतर प्रतिनिधींमध्ये ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, अध्यक्ष पी. जी. जगदीश, उपाध्यक्ष हरमिंदरसिंग मान, सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटचे सिनियर रिसर्च फेलो आशिष वरघणे व अमोल कोकणे आणि संत्रा उत्पादक ऋषिकेश सोनटक्के यांचा समावेश होता. संपूर्ण जगात केवळ विदर्भामध्ये संत्र्यांची एका वर्षात दोन पिके घेतली जातात. पहिले पीक हिवाळ्यात तर, दुसरे पीक उन्हाळ्यामध्ये निघते. हिवाळ्यात पिकणाऱ्या संत्र्याला १० पर्यंत तर, उन्हाळ्यात पिकणाऱ्या संत्र्याला १२ वर फोडी असतात. हा संत्रा गोड-आंबट चवीचा आहे. त्यामुळे तो लोकप्रिय आहे. संत्र्याचे एक झाड १५ वर्षांवर उत्पादन देते. झाडाला झुपक्याने संत्री लागतात. या संत्र्यांची लांब अंतरापर्यंत वाहतूक करता येते. संशोधनामुळे नागपुरी संत्र्याच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत, अशी वैशिष्ट्ये तज्ज्ञ पाहुण्यांना सांगण्यात आली. अन्यत्र कुठल्याही संत्र्यांमध्ये ही वैशिष्ट्ये आढळून येत नसल्यामुळे पाहुणे प्रभावित झाले.

विदर्भातील संत्र्याच्या झाडांना होणाऱ्या विविध आजारांची माहितीही पाहुण्यांना देऊन त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच, विदर्भातील संत्र्याच्या विकासाकरिता सूचना विचारण्यात आल्या. पाहुण्यांनी संत्रा झाडांची देखभाल, औषधांची फवारणी, सिंचन इत्यादीवर मोलाचे मार्गदर्शन केले.

७० एकर जमिनीवर संत्रा शेती
जुनघरे यांची काटोल रोडवर २२३ एकर जमीन असून, सध्या त्यापैकी ७० एकर जमिनीवर संत्र्याची झाडे आहेत. आठ हजार जुनी व सात हजार नवीन अशी एकूण १५ हजार झाडे त्यांच्याकडे आहेत. तसेच, संत्र्याच्या नवीन कलमा लावण्यासाठी आणखी नवीन जमीन तयार करण्यात आली आहे.