मेळघाटातील संघर्ष स्थिती नियंत्रणात

0
1545
Google search engine
Google search engine

गाभा क्षेत्रासह पुनर्वसीत गावांत शुकशुकाट

जंगलांचे नुकसान,हल्ला, जाळपोळ करणार्‍यांचा शोध सुरू

आणखी चार जण ताब्यात

आकोट/ ता.प्रतिनीधी
पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी मेळघाटातील गाभा क्षेत्रात घुसलेल्या पुनर्वसित ग्रामस्त व प्रशासनात पेटलेली संघर्ष स्थिती आज काहीशी नियंत्रणात आली असली तरी वातावरणातील तणाव कायम होता. तर काल झालेल्या या संघर्षातील दोन गंभीर जखमी ची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती डॉ. सुनील लिमये अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वाइल्ड लाईफ) पुर्व विभाग यांनी यावेळी बोलताना दिली.

तसेच या सर्व प्रकरणात जंगलाचे नुकसान करणे ,आगी लावणे हल्ला करणे ,बाबत आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.या हल्ल्याबाबत वनविभागाला कल्पना नसल्याने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तावरील कर्मचारी जखमी झालेत तर पुनर्वसितांच्या समस्यांबाबत महसूल व संबंधित यंत्रणा द्वारा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबाबत गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल तसेच दोषींना सोडण्यात येणार नाही तर निर्दोषांना कुठलाही त्रास होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं गाभा क्षेत्रात घुसलेल्या पुनर्वसितांमधील कुणी जखमी आहे का असे विचारले असता वनविभागाकडे अजून तरी कुणी जखमी आले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

पुनर्वसित गावांमध्ये शुकशुकाट…

काल झालेल्या सशस्त्र संघर्षात अनेक कर्मचारी जखमी झाले असताना गाभा क्षेत्रात घुसलेल्या पुनर्वसितांच्या जखमी असल्याबाबत ठोस माहिती समोर आली नसली तरी पुनर्वसित गावातील वातावरण हे तणाव सदृश्य व शुकशुकाटाचे असल्याचे दिसून येत होते.तर कालच्या या घटनेनंतर अकोटातील वन मुख्यालयासह गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ताफा तैनात करण्यात आला आहे. तर आज प्रचंड बंदोबस्तामुळे कुठल्याही अप्रीय घटनेची पुनरावृत्ती झाली नसल्याचे कळते आहे.

आदिवासींच्या सकुशलतेबाबत अनभिज्ञता….

जवळपास गेल्या आठवड्या भरापासून जंगलात घुसलेल्या आदिवासींबाबत अधिकृत माहिती मिळत नसून आदिवासी हे गाभा क्षेत्रात असल्याने त्यांच्या बाबतीत अनेक बाजू अनभिज्ञ आहेत एकंदरीतच मानवी दृष्टिकोनातून या त्यांच्या अन्न पाणी निवारा बाबतही सामान्य जनांसाठी काळजीचा विषय ठरत असून कालच्या संघर्षात आदिवासींच्या बाबतीत नेमकी परीस्थीती कळली नाही.मात्र पुनर्वसित गावात त्यांच्याबाबत काळजीचे चित्र दिसत असून या पुनर्वसनाच्या समस्येबाबत संतापही दिसून येतो आहे.