अखेर स्वराजचा मृतदेह सापडला – कौंडण्यपुर येथील वर्धा नदीच्या पुलावरील अपघात >< रेस्क्यु टीम परेडमध्ये दंग, चिमुकल्याचा मृतदेह काढण्यास फिरवली पाठ

0
1044
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 
(फोटो – शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे –
   भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकल्या गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली होती. महिलेस तत्काळ नदीपात्राबाहेर काढण्यात आले होते. चिमकुला स्वराज पाण्यात वाहून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बोटीचे सहाय्य घेण्यात आले होते. परंतु शुक्रवारी दुपारी १२ वाजता घटनेच्या काही अंतरावर स्थानिक पातळीवरील गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह शोधून काढला. रेस्क्यु टीमची मागणी केल्यानंतर रेक्स्यु टीम पोहचली नव्हती, त्यामुळे नागरीकांत रेस्क्यु टीम विषयी असंतोष खदखदत होता.
      चांदूर रेल्वे येथील रहिवासी असलेल्या विभा दिवाकर राजूरकर (३५) या त्यांच्या साडेतीन वर्षीय विराज व स्वराज या जुळ्या मुलांसमवेत भाऊ निलेश रमेश डहाके यांच्याकडे जळगाव बेलोरा येथे गेल्या होत्या. बहीण विभा व दोन भाच्यांना दुचाकीवर घेऊन नीलेश गुरुवारी सायंकाळी चांदूर रेल्वेकडे निघाला होता. दरम्यान, कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर निलेशच्या दुचाकीस एमएच ०१ एल ४५०९ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. त्या धडकेने नीलेश व विराज हे दुचाकीसह पुलाच्या कठड्यावर जाऊन पडले, तर विभा व स्वराज कठड्यावरून नदीपात्रात फेकले गेले होते. अपघात घडताच नीलेश बेशुद्ध झाला. दरम्यानच्या कालावधीत अवघ्या १५ मिनिटांत विभा राजूरकर यांना तेथे असलेल्या बोटीच्या साहाय्याने नदीपात्राबाहेर काढण्यात आले. मात्र, स्वराज पाण्याच्या जलद प्रवाहात वाहून गेला. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य आरंभण्यात आले आहे. बोटीच्या साहाय्याने गुरुवारी अंधार होईपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र रात्र झाल्यामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा स्वराजचा शोध घेतला. सकाळी कौंडण्यपूर येथे मुसळधार पाऊस आल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण झाला.  पाणी थांबल्या नंतर गावकऱ्यांनी परत पाण्यात उड्या घेतल्या अखेर काही अंतरावर त्याचा वर्धा नदीच्या खोल पाण्यात शिरवलेल्या दुर्गा देवीच्या पाटाखाली मृतदेह सापडला. घटनास्थळी चांदूर रेल्वेचे सामाजिक कार्यकर्ते निलेश विश्वकर्मा, विवेक बींड उपस्थित होते. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. यानंतर स्वराज शवविच्छेदन तिवसा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. सायंकाळी ४.१५ वाजता मृतदेह शहरातील इंदिरा नगर येथील घरी आणण्यात आला. यावेळी आई विभा व चिमुकला विराज सुध्दा सोबतच घरी आले. आधीच जखमी असलेल्या व प्रकृती ठिक नसलेल्या आईने घरी पुन्हा हंबरडा फोडला. घरात आलेले नातेवाईक तसेच त्या परिसरातील महिलासुध्दा यावेळी अश्रृ थांबवु शकल्या नाही. घरी नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर शोकाकुल वातावरणात स्वराजवर चांदूर रेल्वे येथील हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदूर रेल्वे शहरात सगळीकडे दुख:ची लहर पोहचली होती.
 

रेस्क्यु टीमबद्दल असंतोष

गुरूवारी सायंकाळी ५.४५ घटना असतांना शुक्रवारी सकाळी सुध्दा सापडला नव्हता. अशावेळी रेस्क्यु टीमची आवश्यकता असतांना रेस्क्यु टीम परेडमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आल्याचे काहींनी सांगितले. मात्र २४ तास आपातकालीन सेवेकरीता तत्पर हवे असणारी ही टीम मात्र कौंडण्यपुर येथे पोहचली नव्हती. तेथील गावकऱ्यांच्याच शर्थीच्या प्रयत्नाने चिमुकल्याचा मृदतेह काढण्यात आला. यामुळे रेस्क्यु टीमबद्दल सगळीकडे असंतोष होता.