घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी 22 फेब्रुवारीपूर्वी डीपीआर सादर करा – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0
761

राष्ट्रीय हरित न्यायाधिकारी निर्देशान्वये उच्चस्तरीय प्रकल्प संनियंत्रण समितीचा आढावासांगली, दि. 13 (जि. मा. का.) – घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात कालबद्ध कृती आराखड्यानुसार आणि प्रस्तावित प्रकल्प योग्य दर्जाने कार्यान्वित होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी 22 फेब्रुवारीपूर्वी डीपीआर सादर करा. तसेच, प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू तपासून पाहा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिले.राष्ट्रीय हरित न्यायाधिकारी, पुणे यांच्या निर्देशान्वये गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय प्रकल्प संनियंत्रण समितीच्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल. एस. भड, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, उपअभियंता अमर चव्हाण, वालचंद महाविद्यालयाचे प्रताप सोनवणे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात कालबद्ध कृती आराखड्यानुसार आणि प्रस्तावित प्रकल्प योग्य दर्जाने कार्यान्वित होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती, डी. पी. आर. ची अंमलबजावणी, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापनाच्या चालू प्रकल्पांमुळे पर्यावरण विपरित परिणाम होत नसल्याची खात्री, 20 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या रहिवासी व व्यापारी आस्थापनांना मंजुरी व पर्यावरण प्रमाणपत्र, बांधकामाच्या राडारोड्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यास आग लागू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना, घनकचरा जाळणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थांकडून दंडवसुली आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर म्हणाले, शहरात 4 ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व उद्यानांमध्ये 24 बायो कंपोस्टिंग युनिट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या दोन्ही डेपोंमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 11 रिक्षा घंटा गाड्या कार्यान्वित आहेत. तसेच, प्रायोगिक तत्त्वावर 6 ई रिक्षा घंटागाडी खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच, उघड्यावर कचरा जाळणाऱ्या 5 व्यक्तिंकडून गेल्या 2 महिन्यात 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे सांगितले.