शासनाकडून करणार संकुलाची देखभाल- विभागीय क्रीडा संकुलात सरावापोटी 100 रुपये शुल्क आकारू नये – पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निर्देश

0
717
Google search engine
Google search engine

अमरावती – विभागीय क्रीडा संकुलात सकाळी फिरायला येणा-या, सराव करणा-या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रूपये वसूल करण्याचा निर्णय रद्द करावा व शासनाकडूनच संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. या निर्णय अनेक क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्याशी चर्चा करून हे निर्देश दिले. विभागीय क्रीडा संकुलात सरावासाठी येणा-या खेळाडूंसह फिरण्यासाठी येणा-यांकडून विभागीय क्रीडा संकुल समितीकडून 100 रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली. संकुलाच्या रनिंग ट्रॅक आदींच्या देखभालीपोटी असे शुल्क आकारण्याचा निर्णय संकुल समितीने घेतला होता. मात्र, काही संस्था- संघटनांच्या मागणी लक्षात घेऊन असे कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये आणि शासनाकडूनच या संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिले.

विभागीय क्रीडा संकुल मोठे मैदान, रनिंग ट्रॅक व मध्यवर्ती ठिकाण म्हणून अनेक क्रीडाप्रेमी व नागरिकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांकडून या मैदानाचा सराव, जॉगिंग आदींसाठी वापर होतो. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन विविध प्रोत्साहनात्मक योजना व उपक्रम राबवत आहे. त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन देखभालीपोटी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.