महावितरणची कारवाई अमरावती परिमंडळातील ५ हजार पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

0
1273

महावितरणची कारवाई
अमरावती परिमंडळातील ५ हजार पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

अमरावती, दि. 21 फ़ेब्रुवारी 2019:-

वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या ग्राहकांवर अखेर महावितरणने कारवाईस सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या कारवाईत महावितरण अमरावती परिमंडळातील 5 हजार 152 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुन्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारीत करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक प्रभावी करण्याच्या स्पष्ट सुचना मुख्य अभियंता श्रीमती सुचित्रा गुजर यांनी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.

महावितरणच्या अमरावती परिमंडळात 1 फ़ेब्रुवारी 2019 रोजी देय मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीत असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 52 हजार 528 वीज ग्राहकांकडे सुमारे 18 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी होती. यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींग़ची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असल्याने थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीज खरेदी, कर्मचा-यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्क्म खर्च होतो, यामुळे देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. यासाठी अमरावती परिमंडळातील अमरावती व यवतमाळ जिल्हयातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत आतापर्यंत 5 हजार 152  ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई यापुढेही सतत सुरू राहणार असल्याने ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरण अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत चालू महिन्यात आत्तापर्यंत एकूण 52 हजार 528 थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी 23 हजार 383 ग्राहकांनी 5 कोटी 76 लाख 31 हजार रुपयांचा भरणा केल्यांने त्यांच्यावरील वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टळली आहे. तर 5 हजार 152 ग्राहकांनी वीजबिल भरण्यास प्रतिसाद न दिल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.तसेच खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी ग्राहकांना वीजबिलासोबत पुनर्जोडणी शुल्क दंड म्हणून भरावे लागणार आहे. उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.