आयटीआयच्या रासेयोच्या प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला साहसी अनुभव

0
876
Google search engine
Google search engine

वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन, शोषखड्डे निर्मिती व स्वच्छता अभियान

अकोट,ता.१- दरवर्षी मेळघाटात होणारे निवासी शिबीर ही खरं तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक पर्वणी असते.मेळघाटातील निसर्ग वैभव,वनसंपदा,वाघ-बिबट आदी वन्यप्राण्यांचे भाग्यवंतांना होणारे दर्शन,डोंगराळ पाऊलवाटेवरनं मुक्तपणे होणारी पदभ्रमंती,मोकळ्या आरोग्यवर्धक हवेतून मिळणारा मनमुराद आनंद अनुभवण्यासाठी प्रशिक्षणार्थी अगदी आतूर असतात.यावर्षी ऐतिहासिक नरनाळा किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या संकुलात पार पडलेले रासेयोचे निवासी शिबीर अविस्मरणीय अनुभवांचा खजिना ठरले.शिबीरादरम्यान अनपेक्षितपणे झालेले वाघ,अस्वल,गवा यांचे दर्शन,साहसी क्रिडा प्रकारांमधील थरार,कँम्प फायर,सह वनभोजन,वनोषधी व विविध वनोपजांची माहिती आदींच्या आठवणी प्रशिक्षणार्थ्यांच्या चिरकाळ स्मरणात राहतील.

ह्या शिबीराचे आयोजन २१ ते २७ फेब्रुवारी पर्यत आयटीआयचे प्राचार्य प्रकाश खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे कार्यक्रम अधिकारी विनोद नागोलकर यांनी केले होते.शिबीरात एकूण ५० प्रशिक्षणार्थ्यांनी साहसी अनुभव घेतला.

२१ फेब्रुवारीला शिबीराचे उदघाटन अकोल्यातील कौशल्य विकास व उद्योजकता विभागचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे संचालक डॉ.रमेश देशपांडे उपस्थित होते.या दिनी रक्तदान शिबीर आयटीआय येथे पार पडले.शिबीरात विनोद नागोलकर,निदेशक नंदकिशोर वरोकार सह ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.२२ फेब्रुवारीला आयटीआय येथे दिव्यांग कलावंत रिझवान पटेल यांनी त्यांची सर्वोत्तम कला सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.जर्मनच्या भांड्यांवर संगीत आळवून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला.२३ व २४ फेब्रुवारीला आयटीआय येथे शोषखड्यांची निर्मिती करुन सिंचन चळवळीला प्रोत्साहन दिले.या दिनी रासेयो प्रशिक्षणार्थ्यांनी संत गाडगेबाबांची जयंती आयटीआयचा परिसर स्वच्छ करुन साजरी केली.२५ फेब्रुवारीला रासेयो प्रशिक्षणार्थ्यांनी ग्राम शहानूर गाठून नरनाळा संकुलात साहसी क्रिडांमध्ये सहभाग घेतला.बर्मा ब्रीज क्रॉसींग,हँली क्रॉसींग या साहसी क्रिडांमधील थरार प्रशिक्षणार्थ्यांनी अनुभवला.याच दिनी दुपारी प्रशिक्षणार्थ्यांनी अकोट वन्यजीव विभाच्या जिप्सीत अमोना,धारगड,बोरी,गुल्लरघाट आदी वनपरिसरात जंगल सफारीचा आनंद घेतला.या भ्रमंती दरम्यान भेडकी,चौसींगा, पाणवठ्यावरील सांबर, गवा, चितळ,गवा,सांबर,राष्ट्रीय पक्षी मोर,सर्पगरुड तर परतीच्या सफारी दरम्यान धबधबा परिसराच्या जवळ अस्वल याची देही याची डोळा पाहिल्याने ही जंगल सफारी सफल झाल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली.२६ फेब्रुवारीला प्रकल्प कार्यांतर्गत नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी सति मैदानाजवळ प्रशिक्षणार्थ्यांनी पाणवठ्याजवळ लोटण व चाटणाची निर्मिती करुन वन्यप्राण्यांची सोय केली.त्या प्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी राबविलेल्या प्रकल्पाची प्रशंसा करुन लोटण व चाटणाचे महत्व विशद केले.या प्रकल्पांसाठी प्रशिक्षणार्थी पदयात्रा करत किल्ल्यावर जात असतांना त्यांना नरनाळा किल्ल्याचे अभ्यासक अशोक टेमझरे यांनी किल्याची ऐतिहासिक माहिती दिली.किल्ल्यावर पोहोचल्यावर सायंकाळी प्रशिक्षणार्थ्यांनी किल्ल्याच्या क्षितीजावरुन शार्दूल टेकडीवरील विहंगम दृश्य अनुभवले. याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पर्यटकांसाठी असलेल्या एका पॉईंटवरुन त्यांना प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाले.

२७ फेब्रुवारीला दुपारी या शिबीराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत नरनाळा संकुलातील सभागृहात पार पडला.या समारोपाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश खुळे विराजमान होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आर्ट अॉफ लिव्हींगचे गोपाल कराळे उपस्थित होते.त्या प्रसंगी श्री.कराळे यांनी ध्यानाचे महत्व,कौशल्य विकास,करीअर सल्ला देत प्रशिक्षणार्थ्यांची अॉनलाईन नोंदणी केली.या नोंदणीमुळे प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.समारोपाचे सुत्रसंचालन निदेशक कमलेश गजभीये व आभार प्रदर्शन निदेशक गजानन भांबुरकर यांनी केले.शिबीराच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र वसतकर,निलेश वाघमारे,अनंत गारोडे,सुधीर धर्मे,बंडू वानरे या निदेशकांनी प्रयत्न केले.शिबीरातील विसाव्या दरम्यान नरनाळा सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन वीररस निर्माण केला व दोन मिनीटे मौन राहून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.असे आयटीआयच्या वतीने कळवण्यात आले.