गुरुमाऊलींच्या जयघोषाने दुमदुमली संतनगरी

0
1805

भक्तीरसात न्हाऊन गेले भक्त

माऊलींच्या अश्व रिंगण ‘याचि देही याचि डोळा’

आकोट/प्रतीनीधी
श्री क्षेत्र श्रद्धासागर श्रद्धेय गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांचा १०२वा जन्मोत्सव भक्तीमय वातावणात पार पडला. श्रद्धा,भक्ती आणि ज्ञान अशा त्रिवेणी संगमात अवघे भाविक भक्त न्हाऊन गेलेत.’याचि देही ,याचि डोळा! स्वर्गी नाही हा सुख सोहळा !!’ याचा उत्कट अनुभव घेत राज्यभरातून आलेल्या ५०हजारावर भाविक भक्त धन्य झालेत.

गुरुमाऊलीचा जयंती महोत्सवा निमित्त ह.भ.प. अंबादास महाराज यांचे मार्गदर्शनाखाली
विविध धार्मिक ,आध्यात्मिक ,सांस्कृतिक ,
सामाजिक कार्यक्रम २ते ९ मार्च दरम्यान संपन्न झालेत..
या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती जन्मोत्सवाने झाली.
जन्मोत्सवाचा प्रारंभ ‘श्री’ गुरुंच्या महाभिषेकाने झाला .गुरुमंदीरात संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते ‘श्री’ चा महाभिषेक पार पडला तर ‘श्रीं’ च्या रजत मुखवट्याचा अभिषेक संस्थेचे विश्वस्त मोहनराव पुं. जायले यांनी केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधरराव गोहाड,बाबाराव बिहाडे,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर ,सचिव रविद्र वानखडे व विश्वस्त उपस्थित होते.

अवघी अवतरली पंढरी…

जन्मोत्सवा निमित्त श्री च्या पालखी रथाची नगर प्रदक्षिणा व वारकरी दिंडी सोहळा पार पडला.गुरुमाऊली यांचे निवासस्थानी गुरुमाऊलीच्या रथाचे व विणा पुजन ह.भ.प.माधवराव मोहोकार यांनी केल्यानंतर दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला .या निमित्ताने श्रद्धा स्थळ व संत वासुदेव नगर रांगोळ्या पताकांनी सुशोभीत करण्यात आले होते.
ॐ वासुदेव नमो नमः चा जयघोष,पुंडलिका वरदे…ज्ञानबा तुकारामाचा गजर, टाळमृदंगाचे ठेक्यावर नाचत गात गांवोगांवच्या शेकडो भजनी दिंड्या व हजारो भाविक सहभागी झाल्या होते. भजनी दिंड्यांतील भक्तीस्वरांनी अवघी दुमदुमली पंढरी असे भक्तीमय दृष्य निर्माण झाले होते.दिंडी मार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी करुन गुरुमाऊलींचे मनोभावे दर्शन घेतले.मार्गावर ठिकठिकाणी विविध सेवा मंडळ युवक व सामाजिक संस्थांनी दिंडीचे भावपूर्ण स्वागत दिंडीक-यासाठी करुन पाणी ,चहा,शरबत,मठ्ठा,व नास्त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.. जयस्तंभ चौकात लालबाग गणेशोत्सव मंडळाने श्रीचे पुजन व पुष्पवृष्टीने दिंडीचे भव्य स्वागत केले.

शहराच्या मुख्य मार्गावरुन मार्गक्रमण करीत स.११वाजता दिंडी श्रद्धासागर येथे पोहोचताच भक्तगणांनी पुष्पवृष्टी करीत श्री चे उभे राहून स्वागत केले.

जन्मोत्सवाचा प्रारंभ गुरुपुजन व दिपप्रज्वलन ह.भ.प.विठ्ठल महाराज कोरडे आळंदीकर,ह.भ.प.प्रशांत महाराज ताकोते,ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले,उपाध्यक्ष गंगाधर गोहाड,बाबाराव बिहाडे यांनी केल्यानंतर गुरुवंदना पार पडली. शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख दिलिप बोचे यांनी शिर्डीवरुन आणलेला पाचहजार गुलाब पुष्पांचा हार श्री गुरुंना घालताच पुंडलिका वरदेच्या गजराने वातावरण भारावून गेले.यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविद्र वानखडे ,डाॕ अशोकराव बिहाडे ,दादाराव पुंडेकर, मोहनराव जायले पाटील,सुनंदा आमले,त्र्यंबकराव काळमेघ,सदाशिवराव पोटे,प्राचार्य गजानन चोपडे, अवि गावंडे ,जयदिप सोनखासकर,महादेवराव ठाकरे,अशोकराव पाचडे,दिलिप हरणे,अॕड.शिरीष ढवळे,नंदकिशोर
हिंगणकर ,अनिल कोरपे,कमलताई गावंडे,गजानन दुधाट, कान्हूसेठ राठी,यांनी गुरुवंदना केली.
दरम्यान ह.भ.प.विठ्ठल महाराज कोरडे यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन पार पडले महोत्सवाचे तिर्थाचे उद्यापण विश्वस्त दादाराव पुंडेकर यांचे हस्ते सपत्निक पार पडले. तद्नंतर महाआरती झाली सौ.विद्या जायले यांनी पसायदान झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राममुर्ती वालसिंगे,प्रकाश बिहाडे यांनी केले.शेवटी संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी सर्वांचे आभार मानले.

महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली.५०हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महोत्सवाचे आयोजनात गांवोगांवचे सेवागट,युवक व महिला मंडळ व भक्तगणांनी अथक श्रम घेवून गुरुचरणी सेवा अर्पण केली.
————————-
उत्कृष्ट दिंडी पुरस्कार प्रदान

जयंती महोत्सवांतर्गत आयोजित वारकरी दिंडी सोहळ्यातील उत्कृष्ट दिंडीला संत वासुदेव महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.त्यामध्ये प्रथम ,द्वितिय आणि तृतिय पुरस्कार अनुक्रमे दुर्गा भजनी मंडळ धामणगांव गोतमारे,गुरुमाऊली भजनी मंडळ घुसर आणि नंदीकेश्वर भजनी मंडळ नंदीपेठ हे मानकरी ठरले तर जय मल्हार मंडळ सावरगांव,संत ज्ञानेश्वर मंडळ राजुरा यांना प्रोत्साहनार्थ बक्षिस देण्यात आले.दिंडी प्रमुखांनी हा सन्मान स्विकारला.यावेळी संस्थेला भरिव आर्थिक मदत करणा-या देणगीदारांचा देखिल सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सेवा कार्याप्रती बाबाभाई सेजपाल ,आचार्य पदवी मिळाल्याबद्दल प्रा.डाॕ.गोपाल झामरे.संस्थेचे आश्रयदाते विठ्ठलराव पारसकर ,दिलिप चावडा यांचा विशेष गौरव करण्यात आला.
————————- ——————–
अश्व रिंगण सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले

गुरुमाऊली जन्मोत्सव सोहळ्यात माऊली ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांचा रिंगण भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडून गेला.

याचि देही याचि डोळा असा अभूतपूर्व माऊलींच्या अश्वाचे रिंगण प्रथमच संत नगरीत पार पडले.माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर वारीत कर्नाटकचे अंकलीचे श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्वांनी पुण्य भूमित भक्ती रंगाची उधळण केली.ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरदासांचे भेटीला आहे हा भाव साठवून ठेवत ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात रंगून गेले होते.श्रद्धासागराला ज्ञानसागर विलिन झाल्याचे हे विलोभनिय दृष्य भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेला. हा सोहळा बघण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

प्रारंभी या अश्वाचे पुजना नंतर पताका बारीची धाव आर्कीटेक अनंत गावंडे व ह.भ.प.कृष्णा महाराज गावंडे यांनी घेतल्यानंतर माऊलीच्या अश्वांचे गोल रिंगण झाले.त्यावेळी टाळ मृदंगाचा स्वरात उपस्थितांनी ज्ञानोबा तुकाराम गजराने सारा आसमंत दुमदुमून गेला. अभूतपूर्व म्हणून ही भक्तीरंगाची उधळण अनेकवर्ष स्मरणात राहील.असंख्य भाविकांनी माऊलीच्या अश्वाचे श्रद्धापुर्वक दर्शन घेतले.

दिंडी सोहळ्यात वासुदेव नगर व पोलिस स्टेशनते शिवाजी चौक उभे रिंगण व श्रद्धासागर येथे गोल रिंगण पार पडले.