(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी !’ – ‘R भारत’ वृत्तवाहिनीकडून बांदिवडेकर हे सनातनचे समर्थक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका

0
785
Google search engine
Google search engine

मुंबई – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. ‘बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे समर्थक आहेत. त्यामुळे काँग्रेस ज्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी करते, त्याच्यावर हत्यांचा आरोप करते, त्या संघटनेच्या समर्थकांना ती तिकीट देते’, अशा आशयाचे वृत्त ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. यासाठी त्याने भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचीही प्रतिक्रिया घेतली. त्यात डॉ. स्वामी यांनी बांदिवडेकर यांना उमेदवारी दिल्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. ‘काँग्रेस नेहमीच भाजपवर अशा संस्थांच्या बाजूने असल्याची टीका करत असते; मात्र आता काँग्रेसचा खरा तोंडवळा समोर आला आहे’, असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.

 

‘रिपब्लिक भारत’च्या वृत्तात म्हटले आहे की,

१. सनातन संस्थेचे नाव दाभोलकर आणि अन्य लोक यांच्या हत्येच्या प्रकरणात पुढे आले असतांना काँग्रेसने तिचा विरोध केला होता. मेणबत्ती मोर्चाही काढला होता आणि आता तिच्याच समर्थकाला त्यांनी मतांसाठी उमेदवारी दिली आहे.

२. ‘काँग्रेस का हाथ सनातन संस्था के साथ’ आहे. काँग्रेस सनातनला ‘भाजपची एक शाखा’ असे म्हणत होती. तिच्या समर्थकाला आता तिकीट देण्यात आले आहे.

३. बांदिवडेकर सनातनच्या कार्यात असणारी व्यक्ती आहे. त्यांच्या बैठकांमध्ये ती सहभागी असते. काँग्रेसने संधीसाधूपणा केला आहे. आता काँग्रेसने यावर उत्तर दिले पाहिजे.

४. गौरी लंकेश, दाभोलकर यांची हत्या झाल्यावर काँग्रेसने भाजपवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती आणि ‘भाजप बंदी घालत नाही’, असाही आरोप केला होता; मात्र आता काँग्रेसच या संस्थेच्या जवळच्या व्यक्तीला तिकीट देत आहे.

५. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अधिवक्ता माजिद मेमन यांची प्रतिक्रिया या वेळी घेण्यात आली. त्यांनी ‘याविषयी काँग्रेसला विचारा. मी त्यावर उत्तर देऊ शकत नाही’, असे सांगितले, तसेच ‘आम्ही अशा उमेदवारांना तिकीट दिले नसते’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एबीपी माझा आणि झी २४ तास या वृत्तवाहिन्यांनी बांदिवडेकर आणि सनातन संस्था यांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करून सनातनची अपकिर्ती केली.