मतदान न केल्यास ३५० रु. कपातीची अफवा ; निवडणुक विभाग

0
614
Google search engine
Google search engine

निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण;
पैसे कपातीची अफवा आहे

उस्मानाबाद / प्रतिनिधी – निवडणुकीत कुणी काय शक्कल लढवेल, याचा भरवसाच नसतो. कधी मतदारांना आमिष दाखवले जाते, तर कधी भीती. यामुळे निवडणूक आयोगाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. यावेळी तर कमालच झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली तर मतदारांच्या बँक खात्यातून ३५० रुपये वजा होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत विचारणा होऊ लागल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला स्पष्टीकरण द्यावे लागले. या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून, हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करावे लागले.
मतदान हा भारतीय लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्यासह त्यांची गैरसोय टाळण्याकडेही निवडणूक आयोगाचा कटाक्ष असतो. मतदानाचा अधिकार बजावता यावा, याकरिता सरकारी तसेच खासगी आस्थापनांसह सर्वांनाच सुटीही दिली जाते. सुटी देणे शक्य नसेल, तर मतदानासाठी काही तासांची सवलतीची तजवीजही नेहमीच करण्यात आली आहे. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानाच्या कर्तव्याकडे पाठ फिरवितात हे वास्तव आहे.

मतदान न करणाऱ्या मतदारांबाबत आयोग कठोर भूमिका घेणार असल्याची पोस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाली. मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश आयोगाने जारी केला असून, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. मतदारांचे कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून ३५० रुपये वजा होणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्वच मतदार मतदानाचा हक्क बजावतील असे गृहीत धरून मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च व्यर्थ जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला ३५० रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्याच्याकडून निवडणूक आयोग ३५० रुपये वसूल करेल, असे या पोस्टमध्ये म्हटल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधून अनेक नागरिकांनी या पोस्टबाबत शहानिशा केली. सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या पोस्टमध्ये तथ्य नाही. मतदान हा आपला हक्क असून, प्रत्येकाने तो बजावावा.